आज टेडी डे: प्रेमाची गोजिरी भेट देण्याचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 09:38 AM2018-02-10T09:38:11+5:302018-02-10T09:38:34+5:30
टेडीबिअर. किती क्यूट दिसतो ना? लहान मुलाच्या चेहऱ्यावर असते तसे निरागसत्व दिसते या खेळण्यात. म्हणूनच असेल कदाचित ते लहान मुलांना जाम आवडते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टेडीबिअर. किती क्यूट दिसतो ना? लहान मुलाच्या चेहऱ्यावर असते तसे निरागसत्व दिसते या खेळण्यात. म्हणूनच असेल कदाचित ते लहान मुलांना जाम आवडते. पण, म्हणून तरुणाईने टेडीला जवळ करू नये असे थोडीच आहे. प्रत्येक तरुण-तरुणीतही एक लहान बाळ लपलेले असते आणि मनाचा हळवा कोपरा जिथे व्यक्त करायचा असतो त्या व्यक्तीकडेही असेच लहान मुलाचे मन असावे लागते. तेव्हाच रिती होऊ शकतात अव्यक्त भावनांची वादळे. म्हणूनच तर व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी साजिऱ्या प्रेमाची ही गोजिरी भेट आपल्या जीवलगाला दिली जाते. भले टेडीमध्ये जीव नसतो, त्यात हृदयदेखील नसते आणि कुठला आवाजही नसतो. पण,त्यात साचले असतात प्रेमाचे अफाट भांडार. लोक आपल्या आवडीच्या लोकांकडून गिफ्टमध्ये आलेले टेडीबिअर आपल्या बेडरूम आणि ड्रार्इंग रूममध्ये सजवून ठेवतात. अगदी मोक्याच्या ठिकाणी. का माहितेय? कारण या ते या टेडीत बघत असतात आपल्या जीवलगाचा गोड चेहरा. तुम्ही घेतलाय का असा कुठला टेडी? घेतला असेल तर उगाच वेळ दवडू नका. या टेडीला छातीशी कवटाळत घेऊन जा आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर आणि आपल्या प्रेमाचा इजहार करीत करा त्याच्या हवाली ही प्रेमाची निरागस भेट.
आला कुठून हा टेडी?
हे क्यूट गिफ्ट अमेरिकेची देण आहे. मॉरिस मिचटॉम हा खेळणे विक्रेता होता. एक दिवस त्याने वृत्तपत्रात अस्वलाचे कार्टून बघितले आणि अगदी तसेच रुईचे खेळणे तयार केले. हे खेळणे घेऊन तो अमेरिकेचे २६ वे राष्ट्रपती थेयोडोर रुजवेल्ट यांच्याकडे गेला व या खेळण्याला टेडीबिअर नाव देण्याची गळ घातली. कारण टेडी हे रुजवेल्ट यांचे निक नेम होते. त्यांनीही हसत हसत ही मागणी मान्य केली आणि टेडीचे नामकरण झाले. जगातले पहिले टेडीबिअर म्युझिअम इंग्लंडच्या पिटरफिल्ड हॅम्पियर येथे स्थापन करण्यात आले. आॅस्ट्रेलिया, ब्रिटेन, कॅनडा, जर्मनी आणि जपानमध्ये टेडीबिअर फेस्टिव्हल नियमित आयोजित केले जातात.