आजनी रेल्वे फाटकाजवळ वाहतूककाेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:12+5:302021-09-27T04:10:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गावर आजनी (ता. कामठी) येथे रेल्वे फाटक बराच काळ बंद असल्याने शनिवारी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गावर आजनी (ता. कामठी) येथे रेल्वे फाटक बराच काळ बंद असल्याने शनिवारी (दि.२५) दुपारी माेठी वाहतूककाेंडी झाली हाेती. त्यामुळे या फाटकाजवळ किमान दाेन किमीपर्यंत जड व हलक्या वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. ही काेंडी फाेडण्यासाठी पाेलिसांना या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवावी लागली हाेती.
आजनी येथील रेल्वे फाटक बराच वेळ बंद हाेते. त्यामुळे येथील वाहतूककाेंडी साेडविण्यासाठी नागपूर शहरातून कामठी शहराकडे व पुढे जाणारी सर्व वाहने नागपूर शहरातील ऑटोमोटिव्ह चौकातून कामठी-गुमथळामार्गे नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने वळविण्यात आली हाेती. सकाळी नागपूर शहरात येणारी सर्व वाहने वाडी, काटोल व कोराडी मार्गे तसेच कळमना मार्केट, पारडी, भंडारा व नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी जड वाहने दोन दिवसांपासून ऑटोमोटिव्ह चौक, कामठी, अजनी रेल्वे फाटक ओलांडून गुमथळा परिसरातील नागपूर-जबलपूर महामार्गाच्या दिशेने वळविण्यात आली हाेती.
आजनी येथील रेल्वे फाटक दर पाच मिनिटांनी बंद होत असल्यामुळे नयानगर व आजनी रेल्वे फाटकापासून तर गरुड चौकापर्यंत जड वाहनांच्या लांब रांगा लागल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होऊन ठप्प झाली हाेती. त्यामुळे नागरिकांना तसेच छाेट्या वाहनचालकांसह प्रवाशांना अडीच तास ताटकळत राहावे लागले. मध्येच माेटरसायकल, मिनी ट्रक अथवा कार अडकत असल्याने या समस्येत भर पडत हाेती. ऑटोमोटिव्ह चौकातून कामठी मार्ग वळवलेली जड वाहनांची वाहतूक सरळ कळमना मार्केट, गोमती हॉटेलमार्गे भंडारा रोड सुरू केली तर कामठी येथील वाहतुकीची समस्या त्वरित सुटू शकते, असेही जाणकारांनी सांगितले.