एचआयव्हीशी लढत चिमुकल्याने केली थॅलेसेमियावर मात; उच्च जोखमीचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 08:25 PM2023-02-16T20:25:50+5:302023-02-16T20:26:51+5:30

Nagpur News अवघ्या सात वर्षांच्या रितेशवर ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ हा उपचार यशस्वी होऊन त्याने थॅलेसेमियावर मात केली.

Toddler Battling HIV Overcomes Thalassemia; High risk 'Bone Marrow Transplant' successful | एचआयव्हीशी लढत चिमुकल्याने केली थॅलेसेमियावर मात; उच्च जोखमीचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वी

एचआयव्हीशी लढत चिमुकल्याने केली थॅलेसेमियावर मात; उच्च जोखमीचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वी

Next
ठळक मुद्देसात वर्षीय रितेशच्या हिंमतीला सलाम

नागपूर : रितेश चार महिन्यांचा असताना ‘थॅलेसेमिया’ आजाराचे निदान झाले. दर तीन ते चार आठवड्यांनी त्याला रक्ताची गरज पडत होती. याच रक्तातून त्याला कधी ‘एचआयव्ही’ झाले कळलेच नाही. मात्र सात वर्षांच्या चिमुकल्याने हिंमत हारली नाही. नागपूरच्या थॅलेसेमिया व सिकलसेल केंद्रासह इतरही सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात दिला. याच मदतीमुळे रितेशवरील उच्च जोखमीचा ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वी होऊन त्याने थॅलेसेमियावर मात केली.

‘थॅलेसेमिया’ हा रक्ताचा एक आनुवांशिक आजार. ‘थॅलेसेमिया मेजर’ रुग्णांना वारंवार रक्त देण्याची गरज पडते. रितेश (नावात बदल) चार महिन्यांचा असताना थॅलेसेमिया मेजर असल्याचे निदान झाले. थॅलेसेमिया व सिकलसेल केंंद्राचे संचालक डॉ. विंकी रुघवानी त्याच्यावर उपचार करीत होते. दर तीन ते चार आठवड्यांनी त्याला रक्त द्यावे लागत होते. दुर्दैवाने रक्त संक्रमणाद्वारे त्याला ‘एचआयव्ही’चा संसर्ग झाला. आधीच जीवघेणा थॅलेसेमिया आजार त्यात ‘एचआयव्ही’ची भर पडल्याने गरीब कुटुंबाला मोठा धक्काच बसला.

‘एचएलए’ जुळण्याची शक्यता कमीच

डॉ. रुघवानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, थॅलेसेमियावर ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ हाच एकमेव कायमस्वरूपी उपचार आहे. पण त्यासाठी ‘स्टेम सेल डोनर’ आवश्यक असते. सख्ख्या बहीण किंवा भावाकडून हे ‘एचएलए’ जुळण्याची शक्यता ३० टक्के असते. परंतु रितेशला भाऊ-बहीण नव्हते. पालकांकडून ‘एचएलए’ जुळण्याची शक्यता १ टक्क्यांपेक्षाही कमी होती. सुदैवाने रितेशच्या वडिलांचे ‘एचएलए’ १०० टक्के जुळले.

 उच्च जोखमीचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’

‘एचएलए’ जुळल्याने रितेशला मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. येथील हेमॅटोलॉजिस्ट व बोन मॅरो ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट डॉ. शांतनू सेन यांनी उपचाराखाली घेतले. रितेशला बोन मॅरो ट्रान्सप्लांटपूर्वी दिल्या जाणाऱ्या औषधींमुळे ‘एचआयव्ही’ विषाणूचा भार वाढण्याची शक्यता होती. हे अत्यंत उच्च जोखमीचे प्रत्यारोपण होते. ४ जानेवारी २०२३ रोजी डॉ. सेन यांनी यशस्वी ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ केले. नुकतेच त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

विविध संस्थांचा मदतीचा हात

रितेशचे वडील एका खासगी कंपनीत कारकुनीचे काम करतात. ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’साठी येणारा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. परंतु ‘थॅलेसेमिया आणि सिकलसेल केंद्राचे प्रयत्न कोल इंडिया व इतरही सेवाभावी संस्थांनी दिलेल्या मदतीमुळे लाखो रुपयांचा खर्च पेलणे शक्य झाले.

आता आयुष्यभर एचआयव्ही उपचार 

रितेश थॅलेसेमियापासून बरा झाला, परंतु त्याला रक्त संक्रमणातून झालेल्या ‘एचआयव्ही’वरील औषधोपचार आयुष्यभर घ्यावे लागणार आहेत. रक्तातून होणारे असाध्य आजार रोखणे गरजेचे आहे. यासाठी शासकीय रुग्णालयातून ‘नॅट टेस्टेड्’ रक्त मिळणे आवश्यक आहे.

-डॉ. विंकी रुघवानी, अध्यक्ष थॅलेसेमिया व सिकलसेल केंद्र

Web Title: Toddler Battling HIV Overcomes Thalassemia; High risk 'Bone Marrow Transplant' successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य