निवडणुकीसाठी उधारीवर ‘टॉयलेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 04:46 AM2018-09-12T04:46:22+5:302018-09-12T04:46:30+5:30
ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या घरी शौचालय असणे बंधनकारक असल्यामुळे काही उमेदवारांनी शेजा-याचे शौचालय उधारीवर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
- राम वाघमारे
नांद (नागपूर) : ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या घरी शौचालय असणे बंधनकारक असल्यामुळे काही उमेदवारांनी शेजा-याचे शौचालय उधारीवर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. निवडणुकीपुरता सुरू असलेला हा प्रकार ग्राह्य धरला जाणार की, हे अर्ज छाननीत बाद होणार, याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे.
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात ग्रा.पं. निवडणूक लढवू इच्छिणाºया काही उमेदवारांच्या घरी शौचालय (टॉयलेट) नसल्याने अशांनी आता उसनवारीत शौचालय घेण्याची शक्कल लढविली आहे. शौचालय नसल्याने उमेदवारी अर्ज रद्द होऊ नये, यासाठी तालुक्यातील काही जण चक्क शेजाºयांचे शौचालय वापरत असल्याचे करारपत्रक दाखवत आहेत.
तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम सुरू आहेत. यातही सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुका अधिक चर्चेत आल्या आहेत. बºयाच जणांकडे शौचालये नाहीत. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना कागदोपत्री सुमारे १४ अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये शौचालय ही एक अट आहे. सदस्यपदासाठी निवडणूक लढविणाºया ज्या उमेदवारांकडे शौचालय नाही, अशांनी शेजाºयांकडे असणाºया शौचालयाची उसनवारी करून निवडणुकीपुरती प्रशासनाची फसवणूक करण्याची नामी शक्कल लढविली आहे.
>ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सद्य:स्थितीत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रि या सुरू आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत हे काम चालेल. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर निवडणूक आयोगाच्या निकषात न बसणारे अर्ज रद्द केले जातील.
- डी.जी. जाधव, तहसीलदार भिवापूर