टॉयलेट बनविले; पण लावले कुलूप ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:03+5:302021-08-24T04:13:03+5:30
नागपूर : उपराजधानीतील सर्वात मोठ्या असलेल्या मानकापूर क्रीडा संकुलात स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने अस्वच्छता पसरली आहे. येथे टाॅयलेट बनविल्यावर ...
नागपूर : उपराजधानीतील सर्वात मोठ्या असलेल्या मानकापूर क्रीडा संकुलात स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने अस्वच्छता पसरली आहे. येथे टाॅयलेट बनविल्यावर कुलूप लावण्यात आले. यामुळे शुल्क भरून खेळण्यासाठी येणाऱ्यांना टाॅयलेटचा उपयोग करताच येत नाही. नाईलाजास्तव मैदानालगतच्या झुडपांमध्ये जावे लागत आहे.
स्टेडियमवर अनेक लहान मुलेही आपल्या आईवडिलांसोबत येतात. त्यांनाही या अव्यवस्थेची झळ बसत आहे. गरज भासल्यास अनेकजण इनडाेर स्टेडियमच्या टाॅयलेटचा उपयोग करण्यासाठी जातात. मात्र तेथील कर्मचारी वाईट वागणूक देतात, असा अनेकांचा अनुभव आहे. क्रीडा संकुलातच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय असले तरी खेळाडूंना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
बाहेरील व्यक्ती येऊन स्टेडियमच्या टाॅयलेटमधील साहित्य (नळ, तोट्या, बल्ब आदी) चोरून नेत असल्याने कुलूप लावून टाॅयलेट बंद करण्यात आल्याचे समजते. स्टेडियमच्या सुरक्षेसाठी कर्मचारी तैनात असतानाही चोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. क्रीडा संकुलात शुल्क देऊन येत असल्याने खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना सुविधा पुरवाव्यात, अशी पालकांची मागणी आहे.