राष्ट्रीय महामार्ग ७ वरील टोल प्लाझाची चौथ्यांदा जागा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:02+5:302021-07-07T04:11:02+5:30
नागपूर : नागपूर-सिवनी हायवे क्रमांक ७ वरील एका टोल प्लाझाची चवथ्यांदा जागा बदलण्यात येत आहे. सूत्रांकडून सांगण्यात आले की, ...
नागपूर : नागपूर-सिवनी हायवे क्रमांक ७ वरील एका टोल प्लाझाची चवथ्यांदा जागा बदलण्यात येत आहे. सूत्रांकडून सांगण्यात आले की, खुमारी टोल प्लाझा ३०० मीटर पुढे नेऊन कायमस्वरुपी बनविण्यात येईल. यापूर्वी हा टोल नाका टेकाडी येथे टोल प्लाझा बनविण्यात आला होता. त्याला स्थानिक लोकांनी विरोध केला होता. त्यामुळे मनसर जवळ स्थानांतरित करण्यात आले होते. काही काळ येथे टोल वसुली केल्यानंतर येथे सुद्धा गावकऱ्यांचा विरोध झाला. त्यानंतर खुमारी येथे टीनाचे शेड टाकून टोल नाका सुरू केला होता.
आता पुन्हा खुमारी टोल नाक्याला ३०० मीटर पुढे कायमस्वरुपी स्थानांतरित करण्यात येत असल्याची माहिती आहे. ऑनलाईन टोल वसुली सुरू असली तरी, हायवेवरील काही भागात नेटवर्क मिळण्याची अडचण आहे. बऱ्याचदा वाहन चालक मोबाईलद्वारे फास्टॅग रिचार्ज करू शकत नाहीत.
- डोंगरगाव टोल नाक्यालाही झाला होता विरोध
नागपूर- वर्धा महामार्गावरील डोंगरगाव येथे कायमस्वरुपी टोल प्लाझा निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर या टोलनाक्याला बोरखेडी येथे स्थानांतरित करण्यात आले.
- पाटनसावंगी टोल नाक्याची दुरवस्था
पाटनसावंगी येथे अनेक वर्षांपासून असलेल्या टोल नाक्याची दुरवस्था झाली आहे. या टोलनाक्यावर शेड सुद्धा नाही. एनएचएआयच्या नागपूर रिजनमधील सर्वात निकृष्ट दर्जाचा हा टोल नाका आहे. कोराडी मंदिराजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे वाहनांचे किमान दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागतात. त्यानंतर काही अंतरावरच टोल नाका आहे. या टोल नाक्याला सावनेरजवळ स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु त्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही.