टोमॅटो ५० रुपये; पालक, मेथी, कोथिंबीर स्वस्त - किरकोळमध्ये बहुतांश भाज्या महागच
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 7, 2024 09:25 PM2024-02-07T21:25:10+5:302024-02-07T21:25:19+5:30
भाज्यांची दरवर्षीपेक्षा आवक कमीच
नागपूर : गेल्यावर्षीच्या हिवाळ्याच्या तुलनेत यंदा भाज्या महागच आहे. किरकोळमध्ये बहुतांश भाज्या ५० ते ६० रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली आहे. विक्रेते रस्त्याच्या कडेला पालक, मेथी, कोथिंबीरची जुडी १० रुपयांत आहे. टोमॅटो दर्जानुसार ५० ते ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. कोथिंबीर स्वस्त असल्याने अनेकांच्या घरी सांबारवडीचा पाहुणचार होत आहे.
टोमॅटो लाल !
कॉटन मार्केट सब्जी असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, डिसेंबरअखेरीस आलेल्या पावसामुळे टोमॅटोचे पीक खराब झाले. स्थानिक उत्पादकांकडून आवक कमी झाली आणि भाव वाढले. ठोकमध्ये टोमॅटो ३० रुपये तर किरकोळमध्ये दुप्पट भाव आहेत. सध्या स्थानिकांसह संगमनेर, नाशिक, बुलढाणा, बेंगळुरू, मदनपल्ली येथून आवक आहे. काही दिवसात भाव उतरतील. दररोज आठ ते दहा ट्रकची आवक आहे.
भाज्यांची दरवर्षीपेक्षा आवक कमीच
यंदा हिवाळ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमीच आहे. डिसेंबरअखेरीस मुसळधार पावसामुळे भाज्या शेतातच खराब झाल्या होत्या. दर्जाही घसरला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आवक सुरू झाली. सध्या फूल कोबी, वाल, चवळी, गवार शेंग, बीन्स, ढेमस, भेंडी, कारले, तोंडले, फणस या भाज्यांचे भाव किरकोळमध्ये ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. रायपूर, भिलईसह अन्य राज्यांतून भाज्यांची आवक सुरू आहे.
भाजीपाल्यांचे भाव (किलो, रुपये) :
भाज्या ठोक किरकोळ
टोमॅटो ३० ५०-६०
वांगे ८-१० २०
फूल कोबी २० ३०-३५
पत्ता कोबी १० २०
हिरवी मिरची २५ ४०-४५
सिमला मिरची ३०-५०
वाल शेंग ३० ५०
चवळी शेंग ४० ६०-७०
गवार ४० ६०-७०
ढेमस ४० ६०-७०
कोहळ १५ २५-३०
लवकी ८ १५
मटर ३० ५०
फणस ४० ६०-७०
भेंडी ४० ६०-७०
तोंडले ४० ६०-७०
काकडी १५ २५-३०
गाजर १५ २५-३०
मूळा१५ २५-३०