दरचर्चा संपली; पदार्थांमध्ये दिसू लागलेत टोमॅटो!
By मोरेश्वर मानापुरे | Published: August 27, 2023 05:02 PM2023-08-27T17:02:17+5:302023-08-27T17:05:02+5:30
किरकोळमध्ये ४० रुपये किलो : मालाची प्रचंड आवक
मोरेश्वर मानापुरे -
नागपूर : जुलै महिन्यात अखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवठ्यापर्यंत होलसेल बाजारात प्रतिकिलो १४० रुपये आणि किरकोळमध्ये २२० रुपयांवर गेलेले टोमॅटोचे दर ८ ते १० दिवसांत कोसळले आहेत. रविवारी कळमना होलसेल बाजारात २२ ते २४ रुपये आणि किरकोळमध्ये ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. काही दिवसांआधी महागाईच्या चर्चेत सर्वाधिक टोमॅटोची चर्चा टॉपवर राहायची, पण आता या चर्चेची हवाच निघाली आहे. दर कमी झाल्याने आता सर्वच पदार्थांमध्ये टोमॅटो दिसू लागले आहेत.
कळमना युवा सब्जी अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष विनोद भैसे म्हणाले, मुख्य भाजी मार्केट कळमन्यात १० ऑगस्टनंतर टोमॅटोची आवक हळूहळू वाढू लागली. तेव्हाच्या पाच ते सहा गाड्यांच्या तुलनेत सध्या २६ ते ३० लहानमोठ्या गाड्यांची आवक होत आहे. सध्या मराठवाडा, लातूर, संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, बेंगळुरू, मदनपल्ली, कोलार, अनंतपूर येथून टोमॅटोची प्रचंड आवक आहे. आवक वाढल्याने भावही उतरले आहेत. पुढे आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
आता सर्वच किरकोळ दुकानांमध्ये दिसताहेत टोमॅटो
टोमॅटाचे दर २०० रुपयांवर पोहोचले होते, तेव्हा काहीच किरकोळ दुकानात टोमॅटो विक्रीसाठी दिसायचे. ५० रुपयांत पावभर घ्यायचे असल्यास दुकानदार लहान पाच टोमॅटो न मोजताच पिशवीत टाकायचा. याउलट यावर्षी जानेवारी महिन्यात भाव न मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकल्याचे वृत्त अनेकदा झळकले. तर दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात ५० रुपयांत पाच टोमॅटो विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आली होती. तेव्हा प्रत्येक घरी टोमॅटोच्या दरावर होणारी चर्चा आता बंद झाली आहे. पुढे टोमॅटोचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता विनोद भैसे यांनी व्यक्त केली. लवकरच टोमॅटोप्रमाणे कांद्याचेही भाव कोसळतील, असे भैसे म्हणाले.