कांद्यासोबत आता टोमॅटोही होऊ लागलेत लाल; आवक कमी; भाव वाढले
By मोरेश्वर मानापुरे | Published: November 19, 2023 08:32 PM2023-11-19T20:32:52+5:302023-11-19T20:34:15+5:30
दिवाळीनंतर टोमॅटोचे दर १० ते २० रुपयांदरम्यान असल्याचा सामान्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे.
नागपूर : दिवाळीनंतर टोमॅटोचे दर १० ते २० रुपयांदरम्यान असल्याचा सामान्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. पण यावर्षी पावसामुळे स्थानिक उत्पादकांचे टोमॅटोचे पीक खराब झाले. सध्या नागपूर जिल्हा वगळता महाराष्ट्राचा अन्य भाग आणि आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून टोमॅटो विक्रीसाठी नागपुरात येत आहेत. पुरवठ्याच्या तुलनेत आवक कमी असल्याने किरकोळमध्ये भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. वाढत्या भावामुळे कांद्यासोबत आता टोमॅटोही लाल होऊ लागले आहेत.
दरवर्षी नोव्हेंबरमध्ये असते स्थानिकांकडून आवक
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात स्थानिकांकडून आणि लगतच्या जिल्ह्यातून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक असते. त्यामुळे भाव कमीच असतात. टोमॅटोची शेतातून तोडणी करून बाजारात विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांना वाहतुकीचा दरही परवडत नाही. एवढे दर पडले असतात. याच कारणामुळे शेतकरी हिवाळ्यात बऱ्याचदा टोमॅटो रस्त्यावर फेकतात. अशी स्थिती यंदा नाही. मात्र, मुसळधार पावसामुळे टोमॅटो खराब झाले आहेत. पुरवठ्याच्या तुलनेत आवक कमीच आहे. सध्या संगमनेर, मदनपल्ली (आंध्र) आणि बेंगळुरू येथून टोमॅटो विक्रीसाठी येत आहे. ठोक बाजारात दर्जानुसार किलो भाव २५ ते ३० रुपये आहे. किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये दराने विक्री होत आहे. नागपुरात दररोज २५ ट्रकची आवक आहेत. याउलट भाज्यांचे दर कमी आहेत. फूल कोबी ३०, पत्ता कोबी २० आणि वांगे १० रुपये किलो आहेत.
दीड महिन्यांपासून कांद्याचे भाव स्थिर
कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, कळमन्यात दररोज दक्षिण भारत, महाराष्ट्राच्या औरंगाबाद, नगर, सोलापूर या भागातून १८ ते २० ट्रकची आवक आहे. गुजरातेतून पांढऱ्या कांद्याचे दोन ट्रक विक्रीसाठी येत आहेत. कळमना ठोक बाजारात दर्जानुसार लाल कांदे ४० ते ५० रुपये आणि पांढऱ्या कांद्याचे दर ५० ते ६० रुपये किलो आहेत. हे दर गेल्या दीड महिन्यांपासून स्थिर आहेत. मध्यंतरी ६० ते ७० रुपये किलोवर गेलेले दर सध्या कमी झाले आहेत. राज्याच्या धुळे आणि अन्य भागातून कांद्याची आवक वाढल्यानंतच भाव कमी होतील.
आवक वाढल्यानंतर भाव होतील कमी
विक्रेते भावेश वसानी म्हणाले, नवीन कांदे ४० ते ५० रुपये आणि जुन्या कांद्याचे भाव कमीच आहे. जुन्या कांद्याला मागणी कमी आहे. जुन्या कांद्यामुळे भाववाढीवर नियंत्रण असून नवीन कांद्याचे भाव वाढू देत नाही. मध्यंतरी ६० ते ७० रूपयांपर्यंत वाढलेले भाव सध्या ४० ते ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. पुढे आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील.