सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे उद्या वितरण
By Admin | Published: March 21, 2016 02:41 AM2016-03-21T02:41:20+5:302016-03-21T02:41:20+5:30
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती
नागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार यंदा २२ मार्च रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये सायंकाळी ६ वाजता होईल. सुप्रसिद्ध पार्श्वगायक के. के. यांच्या गीतांची रंगत या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार रूपकुमार राठोड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायक के. के. आणि त्यांचा समूह गीतसंगीताची जादू बिखेरणार आहेत. त्यामुळे रसिकांसाठी त्यांचे सादरीकरण अविस्मरणीय ठरणार आहे.
श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यंदा या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. राष्ट्रीय स्तरावर कला कौशल्याने स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या दोन प्रतिभावंत कलावंतांना यंदा स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी एक लाख रुपये पुरस्कारादाखल प्रदान करण्यात येतील. पुरस्कारप्राप्त कलावंतांना या समारंभात त्यांच्या सादरीकरणासाठी प्रत्येकी १५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. त्यामुळे या नव्या प्रतिभांच्या सादरीकरणाचा आनंदही उपस्थितांना मिळणार आहे. या कलावंताच्या सादरीकरणामुळे त्याच्या प्रतिभेचा परिचय रसिकांना होईल. सुप्रसिद्ध पार्श्वगायक के. के. म्हणजे कृष्णकुमार कुन्नथ. पण चित्रपट सृष्टीत त्यांची ओळख के. के. या नावानेच आहे. गीताला आपल्या आवाजाच्या परिसस्पर्शाने उंचावर नेऊन ठेवण्यात त्यांचे कौशल्य वादातीत आहे.
लोकमत सखी मंच सदस्य आणि वाचकांना नि:शुल्क प्रवेशपत्र
हा कार्यक्रम नि:शुल्क असला तरी सर्वांना प्रवेशपत्रावरच प्रवेश देण्यात येणार आहे. लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्ट आणि लोकमत कॅम्पस क्लबच्या सदस्यांना ओळखपत्रावर प्रत्येकी दोन प्रवेशिका लोकमत सखी मंच कार्यालय, लोकमत भवन, रामदासपेठ येथे २१ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत देण्यात येतील. लोकमतच्या वाचकांनाही बातमीचे कात्रण किंवा जाहिरातीचे कात्रण आणल्यास नि:शुल्क प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, नागपूर येथे दुरध्वनी क्रमांक २४२९३५५ वर संपर्क साधावा.