फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 09:19 PM2020-07-31T21:19:27+5:302020-07-31T21:21:11+5:30
फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेऊन गॅस एजन्सीच्या मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध बजाजनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेऊन गॅस एजन्सीच्या मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध बजाजनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राजेशकुमार ऊर्फ राजसिंग तारकेश्वर सिंग असे आरोपी बिल्डरचे नाव आहे.
काँग्रेसनगर चौकातील न्यू इंग्लिश शाळेजवळ फिर्यादी चंद्रशेखर दादाजी भेंडे यांची गॅस एजन्सी आहे. आरोपी बिल्डर सिंग शततारका पॅलेस दुर्गा मंदिरजवळ राहतो. सिंग याची भेंडेंसोबत जुनी ओळख आहे. भेंडे यांच्या तक्रारीनुसार, बजाज नगरातील एलआयसी कॉलनी गार्डनसमोर आशा बिल्डर यांच्या मालकीची जागा आहे. या जागेवर फ्लॅट स्कीम उभी करण्याची बतावणी करून आरोपी सिंग याने भेंडे यांच्यासोबत बिल्डिंग डेव्हलपमेंट करारनामा केला. १५ फेब्रुवारी २०१५ ते जुलै २०२० यादरम्यान आरोपीने एकूण २० लाख रुपये भेंडे यांच्याकडून घेतले. मात्र पाच वर्षे होऊनही भेंडे यांच्याशी केलेल्या करारानुसार फ्लॅट स्कीम उभी केली नाही. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून आणि खोटे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या सिंग यांच्याविरोधात भेंडे यांनी बजाज नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशीनंतर गुरुवारी राजेश कुमार उर्फ राज सिंग तारकेश्वर सिंग विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.