सणासुदीच्या दिवसांत नागपुरातील रेशन दुकानातून तूरडाळ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:41 PM2019-10-23T22:41:48+5:302019-10-23T22:43:36+5:30
रेशन कार्डवर मिळणाऱ्या तूरडाळीचा तुटवडा भासत आहे. अनेक रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. सणासुदीच्या दिवसात तूरडाळ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशन कार्डवर मिळणाऱ्या तूरडाळीचा तुटवडा भासत आहे. अनेक रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. सणासुदीच्या दिवसात तूरडाळ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दोन वर्षापूर्वी राज्यात तूरडाळीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे रेशन दुकानातून नागरिकांना तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागपूर शहरात ६६५ रेशन दुकाने असून, लाखावर कार्डधारक आहेत. शहराला महिन्याला ६६७ मेट्रिक टन तूरडाळीची गरज आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात शासनाकडून निम्यापेक्षाही कमी पुरवठा झाला. नंतर मात्र तुरडाळीचा पुरवठा हळूहळू कमी करण्यात आला. तूरडाळीसाठी विचारणा केली असता शासनाकडूनच डाळ उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात येत होते. सध्या तूरडाळ नव्वदीच्या घरात आहे. गरिबांना ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने रेशन कार्डधारक रेशन दुकानाकडे धाव घेत आहे. परंतु रेशन दुकानात डाळीचा पुरवठा नसल्याने त्यांना परतावे लागत आहे. ग्रामीण भागात तूरडाळीचा पुरवठा नियमित होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
अन्न व नागरी पुरवठा कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील रेशन दुकानांना तूरडाळीचा पुरवठा शासनाने बंद केला आहे. रेशनकार्डधारकांना तूरडाळ उपलब्ध होणार नाही.