तूर डाळीचे दर १३५ रुपयांच्या विक्रमी पातळीवर!
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 17, 2023 07:01 PM2023-05-17T19:01:58+5:302023-05-17T19:02:19+5:30
Nagpur News सध्या डाळीचे दर १२५ ते १३५ रुपयांदरम्यान असले तरीही येत्या काही दिवसात दरवाढ होऊन १५० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा तूर डाळीचा उच्चांक ठरणार आहे.
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्य पदार्थ म्हणून डाळीकडे पाहिले जाते. आता डाळ महाग झाल्याने खावे तरी काय असा प्रश्न पडू लागला आहे. सध्या डाळीचे दर १२५ ते १३५ रुपयांदरम्यान असले तरीही येत्या काही दिवसात दरवाढ होऊन १५० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा तूर डाळीचा उच्चांक ठरणार आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
आता तूर डाळ उच्चवर्गीयांची
सिझनच्या प्रारंभी तूर डाळीचे दर दर्जानुसार ९५ ते १०५ रुपये होते. हे दर अनेक दिवस स्थिर होते. त्यानंतर स्थानिक शेतकरी, राज्याबाहेरील व्यापारी आणि विदेशातून तूरीची आवक कमी झाल्यानंतर भाव वाढू लागले. त्याप्रमाणात डाळीची किमतीतही वाढली. आता तूर डाळ उच्चवर्गीयांची झाली आहे.
तूर ८८ ते ९५ रुपये किलो
तूर उत्पादनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये महत्त्वाची आहेत. यंदा तूरीचे उत्पादन कमी झाले आहे. दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तूरीचे आयात शुल्क १० टक्क्यांवरून शून्य टक्क्यांपर्यंत कमी केले. त्यानंतरही दर वाढतच आहे. यंदा विदेशात तूरीचे उत्पादन कमी असल्यामुळे आयातीत भाव वाढले आहेत. धान्य आडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, कळमन्यात तूरीचे दर ८८ ते ९५ रुपये किलो असून आवक दररोज १५०० ते २ हजार क्विंटल आहेत. या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. पण यंदा पुरेशी तूर मिळत नाही. त्यामुळेच तूर डाळीचे दरही वाढत आहेत. डाळीचे दर वाढत असल्यामुळे तुरीलाही आधार मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आयात कमीच
धान्य बाजाराचे विश्लेषक प्रताप मोटवानी म्हणाले, यंदा देशात तूरीचे उत्पादन आणि तूरीची आयात कमीच आहे. दरवर्षी बर्मा, सुदान आणि दक्षिण अफ्रिकन देशातून तूरीची आयात होते. सरकारने आयात शुल्क शून्य टक्क्यांवर आणून आयातीचे दरवाजे खुले केले आणि आयातीची मर्यादाही हटविली. त्यानंतरही आयात कमीच आहे. सरकारच्या या निर्णयामुळे डाळीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. देशात डिमांड जास्त तर पुरवठा कमी आहे. दुसरीकडे भारतातून तूर डाळीची निर्यात होते. नवीन तूरीचे उत्पादन जानेवारीमध्ये येते. उत्पादन येईपर्यंत तूरीचे दर कमी होणार नाहीत.
पॅकेजिंगवर ५ टक्के जीएसटी
तूर डाळीच्या १ ते २५ किलोच्या पॅकिंगवर सरकारतर्फे ५ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. जीएसटी लागू नये म्हणून व्यापाऱ्यांनी तूर डाळीच्या पोत्याची भरती २६ किलो केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार लहान व्यापाऱ्यांना साठ्याचा डेटा द्यावा लागतो. मोठ्या कंपन्यांना कायदा लागू आहे वा नाही, हेच कळत नाही. बाबा रामदेवबाबा यांना जीएसटीमध्ये सूट आहे. अशीच सूट लहान व्यापाऱ्यांनाही मिळावी, अशी मागणी प्रताप मोटवानी यांची आहे.
तूर डाळीचे दर (प्रति किलो) :
वऱ्हाडी फटका १३२-१३५
मध्यम फटका १२५-१३०
फोड १२०-१२५