सीए अंतिम परीक्षेत धु्रव नागपुरात टॉपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:54 AM2019-08-14T00:54:44+5:302019-08-14T00:55:49+5:30
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे-जून २०१९ घेण्यात आलेल्या सीए अंतिम वर्षाच्या नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल मंगळवारी घोषित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे-जून २०१९ घेण्यात आलेल्या सीए अंतिम वर्षाच्या नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल मंगळवारी घोषित करण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत नागपुरातील ध्रुव डागा याने अखिल भारतीय स्तरावर (एआयआर) १९ वे स्थान प्राप्त करून नागपुरात प्रथम स्थान पटकविले. गरिमा छांवछरिया हिने एआयआर २१ वे स्थान मिळवित द्वितीय आणि एआयआर २३ वे स्थान मिळवित मोहम्मद वली याने नागपुरात तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
निकाल सायंकाळी घोषित झाल्यामुळे आयसीएआयच्या नागपूर शाखेकडून विस्तृत निकाल, नागपुरातील किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि किती विद्यार्थी यशस्वी ठरले, याची माहिती मिळू शकली नाही. यावर्षी अंतिम निकालाची टक्केवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन टक्के वाढली आहे. या संदर्भात नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सीए सुरेन दुगरकर यांनी बुधवारी विस्तृत माहिती मिळणार असल्याचे सांगितले.
ध्रुवने गाठले यशाचे शिखर
ध्रुव डागा याने सीबीएसईमधून इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. या दोन्ही परीक्षांमध्ये धृ्रव टॉपर होता. बारावीत कॉमर्स शाखेत नागपुरात पहिले स्थान मिळविले होते. त्याने यशाचा क्रम सीए परीक्षेतही कायम ठेवला. सीपीटी आणि त्यानंतर इंटरमीडिएट परीक्षेतही धृ्रव टॉपर होता. लोकमतशी बोलताना धृ्रव म्हणाला. नियमित अभ्यासामुळे यश संपादन केले. अनेक तास अभ्यास करण्याचा विचार कधीही केला नाही. अभ्यासासाठी ‘क्वालिट टाइम’ दिला आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून चांगले प्रदर्शन केले.
कठोर परिश्रमाचे फळ
गरिमा छांवछरिया म्हणाली, कठोर परिश्रम आणि नियमित अभ्यासामुळे यश मिळाले. सीए परीक्षेच्या तयारीसाठी एकाग्रता आवश्यक असते. तासन्तास अभ्यास करण्याऐवजी वाचलेले चांगल्यारीतीने समजणे आवश्यक आहे. शांत चित्त ठेवून अभ्यास करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. गरिमाने सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तम प्रदर्शन करून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले होते. बारावीत ९६.४० टक्के गुण मिळविले होते.
मोहम्मद वली अभ्यासासह खेळातही अव्वल
अखिल भारतीय स्तरावर मोहम्मद वली याने २३ वे स्थान प्राप्त केले आहे. तो अभ्यासासह खेळातही आघाडीवर आहे. दोनदा राष्ट्रीय लॉन टेनिस आणि स्विमिंग स्पर्धेत भाग घेतला आहे. लॉन टेनिसमध्ये ज्युनिअर मुलांमध्ये आशियात तिसरे स्थान मिळाले आहे. वलीने सीपीटीमध्ये २०० पैकी १६२ गुण मिळविले होते. तर आयपीसीसी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पाच विषयात प्राविण्य श्रेणीसह उत्तीर्ण केली होती. मोहम्मद वलीने यशाचे श्रेय वडील अली असगर आणि आई डॉ. लुलू फातेमा वली यांना दिले आहे.