नागपुरातील वीज वितरण खासगीकरणाच्या दिशेने; टोरंट पॉवर लिमिटेडकडून शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 11:25 AM2023-01-09T11:25:21+5:302023-01-09T11:26:21+5:30
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले
नागपूर : नागपुरातील वीज वितरण क्षेत्राचे खासगीकरण होण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. नागपूर व लगतच्या क्षेत्राकरिता वितरण परवाना मंजूर करण्यासाठी टोरंट पॉवर लिमिटेडने दाखल केलेल्या अर्जावर सूचना व हरकती मागवण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने यासंदर्भात दिलेले वृत्त अखेर खरे ठरले.
काही दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने नागपूर व पुणे येथील वीज वितरणाचे खासगीकरण होणार असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. महाराष्ट्रातील भिवंडी आणि शील-मुंब्रा-कळवात वीज वितरण फ्रँचाइजी सांभाळत असलेली कंपनी टोरंट पॉवरने नागपुरात वीज वितरणप्रणाली सांभाळण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश नियामक आयोगात समांतर वीज वितरणाच्या लायसन्सची मागणी केली आहे. प्रदेश विद्युत नियामक आयोग टोरंटच्या अर्जाची पडताळणी करीत असून, सर्व काही बरोबर असल्यास आयोग कंपनीला या संदर्भात पब्लिक नोटीस जारी करण्याची परवानगी देईल, असेही स्पष्ट केले होते. रविवारी ८ जानेवारी रोजीच्या अंकात टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीकडून जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात नागपूर आणि लगतच्या क्षेत्राकरिता वितरण परवाना मंजूर करण्यासाठी कंपनीने दाखल केलेल्या अर्जावर सूचना व हरकती मागवण्याची सूचना करण्यात आली आहे. एकूणच नागपुरातील वीज वितरणाच्या खासगीकरणाच्या दिशेने सुरुवात झाली आहे.
- नागपुरात ८ वर्ष फ्रॅंचाइजीने केले काम
महावितरणची शहरात तीन विभागांत महाल, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्समध्ये वीज वितरणप्रणाली ८ वर्षांपर्यंत फ्रँचाइजीच्या स्वाधीन राहिली होती. १ मे २०११ रोजी या विभागांची वीज वितरण फ्रँचाइजी स्पॅनकोला सोपविण्यात आली होती. स्पॅनको दुसऱ्या वर्षीच हटविण्यात आली आणि एसएनडीएलने कामकाज सांभाळले. एसएनडीएलही काम सांभाळू शकले नाही आणि ९ सप्टेंबर २०१९ रोजी महावितरणने पुन्हा कामकाज सांभाळले. आता पुन्हा खासगीकरणासाठी पुढाकार घेणे सुरू झाले आहे.