विदर्भात कोसळल्या मुसळधारा, जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:20 AM2022-07-25T11:20:33+5:302022-07-25T11:44:56+5:30
सखल भागात पाणी शिरले ; माजरीला पुराच्या पाण्याचा वेढा, शेतकरी चिंताग्रस्त
नागपूर : रविवारी नागपुरात थोडा वेळ उसंत घेऊन मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले. नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ५ ते ५.३० वाजता मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर कमी असला, तरी झड सुरूच आहे. मूलमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले. तर माजरीला पुराच्या पाण्याने वेढले होते. रविवारी सकाळी या परिसरातील पूर ओसरला असला, तरी सायंकाळपासून पावसाची झड सुरू झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. गोंदियात रविवारी अधूनमधून सरी बरसल्या. गडचिरोलीत पावसाने उघडीप दिली.
यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून वर्धा जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वणी तालुक्यातील कवडशी, चिंचोली, नवी सावंगी या तीन गावांचा संपर्क तुटला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दारे १०० सेंटिमीटरने उघडली असून दोन हजार ५८२.३० घ.मी. प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. झरी तालुक्यातील शिबला मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. वऱ्हाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात रविवारी पावसाची रिपरिप सुरू होती. बुलडाणा जिल्ह्यात काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील सिंगडोह सिंगणापूर येथे नाल्याला पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात रिपरिप
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात तुलनेत जोरदार सरी कोसळत राहिल्या. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला असून, रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला ३०, महाबळेश्वर येथे ६५ मिलीमीटरची नोंद झाली आहे तर कोयना धरणातील पाणीसाठा ६२ टीएमसीवर गेला आहे.
जगबुडी नदीचे पाणी पुन्हा इशारा पातळीवर
आठवडाभर विश्रांतीनंतर रविवारी रत्नागिरीत पावसाने पुन्हा हजेरी लावली. खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पाणी पुन्हा इशारा पातळीवर आले आहे. नदीची पाणीपातळी ५.५० मीटरपर्यंत पाेहाेचली आहे.
अप्पर वर्धा धरणाची १३ दारे उघडली
nअप्पर वर्धा प्रकल्पाचे १३ गेट २०० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीला पूर येऊन आष्टी ते मोर्शी हा मार्ग बंद झाला आहे. आर्वी तालुक्यात कोपरा पुनर्वसन येथील २४ वर्षीय एक व्यक्ती पुराच्या पाण्यात रात्री ९ च्या दरम्यान अडकली होती. जिल्हा बचाव व शोध पथकाने या व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढले.
nनिम्न वर्धाचे ३१ दरवाजे १०० सेंमीने उघडणार असल्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कौंडण्यपूर पुलावरून पाणी वाहत असल्याने कौंडण्यपूर ते आर्वी रस्ता बंद झाला.
मराठवाड्यात संततधार
जालना/लातूर/परभणी : मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत रविवारी संततधार पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह जिल्हाभरात रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर रिमझिम पाऊस झाला असून, गेल्या २४ तासांमध्ये २५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातही आतापर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब भरला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशीही संततधार होती. परभणी जिल्ह्यात जुलैतील संततधार पावसाचा खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस पिकाला फटका बसला आहे.