मुसळधार पावसाने हाेईल जुलैचा शेवट; हवामान विभागाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 10:27 AM2021-07-28T10:27:23+5:302021-07-28T10:27:45+5:30
Nagpur News दाेन दिवसापासून थांबून थांबून हाेणाऱ्या पावसाने उसंत दिली असली तरी जुलै महिन्याच्या शेवटचे तीन दिवस मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दाेन दिवसापासून थांबून थांबून हाेणाऱ्या पावसाने उसंत दिली असली तरी जुलै महिन्याच्या शेवटचे तीन दिवस मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसाही जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हाेताे. दरम्यान मंगळवारी दिवसभर आकाशात ढग दाटलेले हाेते. दुपारी ३ वाजतापासून पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे उष्णता कमी झाली तर कमाल तापमानात १.८ अंशाची घट हाेऊन ३०.७ अंश नाेंदविण्यात आले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार हाेत आहे. हे क्षेत्र दाेन दिवसात झारखंड व बिहारसह इतर राज्यातही वाढेल. बंगालच्या उपसागरात काही हालचाली झाल्यास त्याचे थेट परिणाम मध्य भारतावर हाेतात. त्यामुळे २९ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत नागपूर जिल्ह्यात जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता आहे.
हवामान विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त आकड्यानुसार १ जून ते २७ जुलैपर्यंत ५४२.६ मिमी पावसाची नाेंद झाली आहे, जी सामान्यपेक्षा २३.७७ टक्के अधिक आहे. या काळात सरासरी ४३८.४ मिमी पाऊस नाेंदविला जाताे. आतापर्यंत मान्सून हंगामात ५७.०३ टक्के पाऊस झाला आहे.
दरवर्षी हंगामात सरासरी ९५१.४ मिमी पाऊस नाेंदविला जाताे. शहरात जून महिन्यात २५३.३ मिमी पाऊस झाला, जाे सामान्यपणे १७३.३ मिमी असताे. यावर्षी जून महिन्यात सामान्यपेक्षा ४६.१६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जुलैच्या २७ दिवसात २८९.३ मिमी पाऊस नाेंदविला गेला, जाे सामान्यपेक्षा ९.१ टक्के अधिक आहे. या काळात सरासरी २६५.१ मिमी पावसाची नाेंद केली जाते. जिल्ह्यात ४६४.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली, जी सामान्यपेक्षा ८.११ टक्के अधिक आहे.