कुठे दमदार तर कुठे रिमझिमने भिजवले! ब्रम्हपुरी, गाेंदियात जाेरदार सरी
By निशांत वानखेडे | Published: July 9, 2023 07:14 PM2023-07-09T19:14:01+5:302023-07-09T19:14:15+5:30
जुलैचा पहिला आठवडाभर हुलकावणी देणाऱ्या पावसाने शनिवारी रात्री विदर्भात सर्वत्र समाधानकारक हजेरी लावली.
नागपूर : जुलैचा पहिला आठवडाभर हुलकावणी देणाऱ्या पावसाने शनिवारी रात्री विदर्भात सर्वत्र समाधानकारक हजेरी लावली. काही जिल्ह्यात रात्रभर जाेरदार सरी बरसल्या तर काही भागात रिमझिम सरींनी रान भिजवले. मात्र नागरिकांसाेबत पावसानेही रविवारी सुटी घेतली.
रात्रीपासून रविवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक १११ मि.मी. पावसाची नाेंद झाली. जवळपासच्या नागभीड, सिंदेवाहीत चांगला पाऊस पडला. या काळात गाेंदिया व वर्ध्यामध्ये चांगल्या सरी बरसल्या. या जिल्ह्यात अनुक्रमे ५३.६ व ५६.२ मि.मी. पाऊस झाला. गाेंदियाच्या देवरी तालुक्यातही दमदार हजेरी लावली. नागपूरला पावसाचा जाेर कमजाेर असला तरी रात्रभर पावसाची रिपरिप चालली हाेती. त्यामुळे सकाळी ८.३० पर्यंत ४७.७ मि.मी. पावसाची समाधानकारक नाेंद झाली. जिल्ह्यात भिवापूर तालुक्यात मात्र जाेरदार बरसला व ८२.२ मि.मी.ची नाेंद झाली. कुही तालुकासुद्धा पावसाच्या प्रभावात हाेता. अमरावती ४०.४ व आणि अकाेल्यामध्येही ३२.२ मि.मी नाेंदीसह रिमझिम सरींनी जमिनीला ओलावा दिला.
रविवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले असले तरी दिवसभर पावसाची मेहरबानी झाली नाही. नागपुरात १ मि.मी. च्या नगण्य हजेरीसह दिवस मावळला. काही काळ तर आकाशात उन पडले हाेते. पुढचे काही दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान दाेन दिवस मध्य प्रदेशात जाेरदार पावसाचा इशारा दिला असल्याने त्या प्रभावाने पाऊस हाेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.