अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी सख्ख्या भावांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:31 PM2019-12-08T23:31:20+5:302019-12-08T23:31:25+5:30
आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी फोनवर संपर्क साधला.
नागपूर : दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे महिनाभरापूर्वी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर (टाकळघाट, ता. हिंगणा) येथे घडली असून, रविवारी (दि. ८) दुपारी उघडकीस आली. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे.
आकाश संजय कारमोरे (२७) व शुभम संजय कारमोरे (२१) दोघेही रा. गंगापूर झोपडपट्टी, टाकळघाट, ता. हिंगणा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडिता ही १४ वर्षीय असून, ती मूळची लाखनी (जिल्हा भंडारा) आहे. आई व वडील विभक्त राहत असल्याने तिची आई बुटीबोरी परिसरातील टेंभरी येथे राहत असून, एका विश्रामगृहात मजुरी करून उदरनिर्वाह करते. शिवाय, ती मूळ गावी शिक्षण घेते. दिवाळीच्या सुट्यांमध्ये ती आईकडे आली होती.
आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी फोनवर संपर्क साधला. तिला वेगवेगळ्या बाबींची बतावणी करीत आमिष दाखविले आणि पळवून नेले. दुसरीकडे आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदविली होती. हा प्रकार नातेवाईकांना कळताच त्यांनी तिला शोधून रविवारी पोलीस ठाण्यात आणले.
महिला पोलिसांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली, तेव्हा तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आकाशने अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले तसेच आकाशने तिला गंगापूर येथे त्याच्या मामाच्या घरी ठेवल्याचेही तिने सांगितले. त्यासाठी त्याने तिला आईवडील नसल्याचे कारण मामाला सांगितले होते. तिथे शुभमने जवळीक साधत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे तिने सांगितले. परिणामी, एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ३६३, ३६६, ३७६ व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.
दोघेही अवैध दारू विक्रेते
आकाश व शुभम हे अवैध दारूविक्री करतात. एका पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई झाल्याने ते नातेवाईकांकडे दुसºया गावाला जातात आणि तिथेही दारूविक्री सुरू करतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात नागपूर व वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत अवैध दारूविक्रीचे गुन्हे नोंदविले आहेत. पोलिसांनी आकाशला वर्धा जिल्ह्यातून तर शुभमला टाकळघाट येथील विक्तुबाबा देवस्थान परिसरातून ताब्यात घेत अटक केली.