टीव्ही पाहण्यासाठी आलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 09:30 PM2022-04-07T21:30:46+5:302022-04-07T21:31:23+5:30
Nagpur News टीव्ही पाहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा येथे घडली.
नागपूर : खापरखेडातील वलणी झोपडपट्टीत राहणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सुनील उर्फ मोटू धनलाल धुर्वे (२६, रा. वलनी, तट्टा लाईन झोपडपट्टी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारकर्ती महिला ही तिचा पती चार वर्षीय मुलगा आणि पाच वर्षीय मुलीसह वलणीच्या तट्टालाइन झोपडपट्टी येथे राहतात. आरोपी सुनील हा याच वस्तीत राहतो. आरोपी हा त्याची आई, तीन भाऊ, वहिनी आणि दोन पुतण्यासोबत राहतो. पीडित मुलगी ही आरोपीच्या पुतणी सोबत रोज खेळायला जात असते. बुधवारी रात्री ९.३० वाजता तक्रारकर्त्या महिलेचा पती घरी दारू पिऊन आल्याने ती मुलांना घेऊन याच वस्तीत राहत असलेल्या आईकडे आली. त्यांच्या मागे तिचा पती पोहोचला. पत्नीला तिथेच सोडून तो मुलगा व मुलीला घेऊन घरी जातो असे सांगून निघून गेला. मात्र घरी न जाता शेजारी राहणाऱ्या सुनीलच्या घरी टीव्ही पाहण्याकरिता मुलांना घेऊन गेला. रात्री १० वाजता पीडित मुलीची आई सुनीलच्या घरी आली तेव्हा तिची ५ वर्षीय मुलगी तिथे नव्हती.
टीव्ही पाहताना झोपी गेली होती चिमुकली
महिलेने मुलीबाबत विचारपूस केली असता तेव्हा आरोपीच्या आईने सांगितले की टीव्ही पाहत असताना मुलगी सोफ्यावर झोपून गेल्याने तिला सुनील तुमच्या घरी घेऊन गेला. घरी जाऊन पाहिले तर मुलगी तिथे नव्हती. यानंतर महिला, तिचा पती आणि सुनीलच्या आईने मुलीचा शोध घेणे सुरू केले. यानंतर मुलगी हरविल्याची बातमी झोपडपट्टीत पसरली. रात्री ११ वाजताच्या सुमारास पीडित पाच वर्षीय मुलगी ही झोपडपट्टीच्या मागील भागातून अंधारातून रडत येताना दिसली. तिला विचारपूस केली असता तिने तिच्या सोबत झालेला प्रकार सांगितला. यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सुनील यास वलणी शिवारातून पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक हृदयनाथ यादव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पल्लवी काकडे, प्रतिभा मरसकोल्हे, आशिष मेश्राम, उमेश ठाकरे, राजू भोयर, आशिष भुरे, प्रमोद भोयर, नुमान शेख, संतोष ढाकणे यांनी केली.