लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:29+5:302021-09-04T04:13:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : फेसबुकमुळे झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्याचा फायदा घेत तरुणीला लग्न करण्याची बतावणी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : फेसबुकमुळे झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्याचा फायदा घेत तरुणीला लग्न करण्याची बतावणी करीत तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित करण्यात आले. त्याने लग्नाला नकार देताच प्रकरण पाेलिसात गेले आणि आराेपीला अटक करण्यात आली. हा प्रकार खापरखेडा येथे नुकताच उघडकीस आला.
विक्रांत उर्फ विक्की चुन्नीलाल हाडके (३७, रा. हरदास नगर, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. विक्रांतची सहा महिन्यांपूर्वी खापरखेडा (ता. सावनेर) येथील तरुणीशी फेसबुकमुळे ओळखी झाली. पुढे त्यांचे फाेनवर संभाषणही सुरू झाले. त्यातच त्याने २३ मे २०२१ राेजी खापरखेडा येथे टॅटूचे दुकान सुरू केले. दुकान बघण्यासाठी त्याने तिला दुकानात बाेलावले हाेते. ३० मे राेजी ती खैरीपर्यंत ऑटाेने आली असता त्याने तिला त्याच्या माेटारसायकलवर खापरखेडा येथे आणले व लग्न करण्याची बतावणी करीत दुकानात तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर कन्हान (ता. पारशिवनी) येथील लाॅजवर दाेनदा व नंतर कामठी शहरातील त्याच्या दुकानात अत्याचार केला. हा प्रकार कुणालाही न सांगण्याची धमकीही त्याने तिला दिली हाेती. त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याने तिने पाेलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी बुधवारी (दि. १) भादंवि ३७६ (२) (एन) अन्वये गुन्हा दाखल करून गुरुवारी (दि. २) त्याला अटक केली. सावनेर येथील न्यायालयाने त्याला न्यायालयीन काेठडी सुनावल्याने त्याची रवानगी नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक प्रीतम निमगडे यांनी दिली.