एकूण पदके २३७, तंदुरुस्त शरीर आणि अवघे पाऊणशे वयोमान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:18 AM2018-03-21T10:18:21+5:302018-03-21T10:37:12+5:30
नागपुरातील प्रभाकर साठे वय वर्षे ७५. आॅफिसर्स क्लबच्या जलतरण केंद्रावर नियमित सकाळी साठेकाका तरुणालाही लाजवेल असा सूर मारतात. फिटनेसचे गुपित विचारल्यावर ते म्हणतात, पोहण्याच्या सातत्यामुळे माझे मन, बुद्धी आणि शरीर अगदी निरोगी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील प्रभाकर साठे वय वर्षे ७५ यांना बघितल्यावर वाटणार नाही, या वयातही ही व्यक्ती एवढी फिट कशी. आॅफिसर्स क्लबच्या जलतरण केंद्रावर नियमित सकाळी साठेकाका तरुणालाही लाजवेल असा सूर मारतात. कधी तास, कधी दोन तास अगदी लहान मुलांसारखे पाण्यात खेळतात. त्यांच्या फिटनेसचे गुपित विचारल्यावर ते म्हणतात, पोहण्याच्या सातत्यामुळे माझे मन, बुद्धी आणि शरीर अगदी निरोगी आहे. त्यामुळे पाऊणशे वयोमानातही मी दवाखान्याचे तोंड बघितले नाही.
निव्वळ आनंद म्हणूनच नाही, तर साठे यांनी वयाची पंचाहत्तरी गाठताना अनेक विक्रमही प्रस्थापित केले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी विश्व मास्टर्स जलतरण सूर स्पर्धा स्वीडन २०१०, रिमिनी - इटली २०१२, मॉन्ट्रियल- कॅनडा २०१४, कझान -रशिया २०१५, येथे सूर स्पर्धेत ५ पदके प्राप्त केली आहेत. आतापर्यंत त्यांनी १५० सुवर्ण, ५५ रौप्य व ३२ कांस्य अशी एकूण २३७ पदके प्राप्त केली आहेत.
प्रभाकर साठे हे शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातून विभागीय ग्रंथपाल म्हणून २००३ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी ३५ वर्षे येथे सेवा दिली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी अंबाझरीच्या नाल्यात गुराख्यांच्या मुलांसोबत पोहणे शिकले. १९६५-६६ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठाचा उत्कृष्ट जलतरण व सूरपटूचा सन्मान प्राप्त केला. त्यांनी जिल्हा ते राष्ट्रीय जलतरण सूर स्पर्धा गाजविल्या.
त्यांचे विशेष कौतुक म्हणून या वयातही त्यांनी दोन मुलांना अंबाझरी तलावात बुडता बुडता वाचविले. ३१ मे २०१६ रोजी अंबाझरी तलावात दोन मुले पाण्यात गटांगळ्या खात होती. प्रभाकर साठे यांना दिसताच, त्यांनी तत्काळ तलावात उडी घेतली आणि दोघांचेही प्राण वाचविले. त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले.
शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोहण्यास कधी खंड पडू दिला नाही. यातच ते आपल्या जीवनाचा आनंद मानतात.
मी निरोगी असल्याचा अभिमान आहे
निवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने आपले शरीर सांभाळणे महत्त्वाचे आहे. पोहण्यामुळे शरीर, मन, शांत व स्थिर राहून शरीराला लवचिकता प्राप्त होते. पोहण्यासारखा आनंद नाही, मग कितीही टेन्शन असेल तरी, तुम्ही जग विसरता, आनंद मिळतो. या वयातही मी निरोगी असल्याबद्दल मला अभिमान आहे.
- प्रभाकर साठे,
मास्टर्स जलतरणपटू