तोतलाडोह ४३.१३ टक्के भरला : पाणीकपातीचे संकट दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:02 AM2019-09-05T00:02:56+5:302019-09-05T00:03:52+5:30
मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मात्र बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने चौराईचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. प्रकल्पात आवश्यक जलसाठा झाल्याने नागपूर शहरावरील पाणीकपातीचे संकट दूर होणार आहे. प्रकल्पात ५५ ते ६० टक्के जलसाठा झाल्यास शेतीलाही पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.
गेल्या २४ तासात तोतलाडोहचा पाणीसाठा ४ टक्क्यांनी वाढला आहे. तोतलाडोहाची एकूण क्षमता ११६६.९३.९३ दलघमी आहे, तर प्रकल्पात जलसाठा ४३८.६४ दलघमी झाला आहे. गेल्या वर्षी ४ सप्टेंबरपर्यत २७.२८ टक्के जलसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकल्पात १५.८५ टक्के अधिक जलसाठा झाला आहे. गणेशोत्सव विचारात घेता महापालिकेने १५ सप्टेंबरपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढेही कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, १५ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह प्रकल्पात फक्त २.५ टक्के जलसाठा होता. तो ४ सप्टेंबरला ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. गेल्या १५ दिवसात ३८ टक्के जलसाठा झाला आहे. मध्य प्रदेशात पाऊ स सुरू राहिला तर तोतलाडोहातील जलसाठ्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
नवेगाव खैरी प्रकल्पातील जलसाठ्यात सुधारणा होत आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा आहे. गेल्या वर्षी ३८.२४ टक्के जलसाठा होता. यंदा ३०.८६ टक्के आहे. कामठी खैरी प्रकल्पात ४३.८१ दलघमी पाणी उपलब्ध आहे.