तोतलाडोह, खेकरानाला, वडगाव धरणाचे दरवाजे उघडले
By आनंद डेकाटे | Published: July 28, 2024 07:14 PM2024-07-28T19:14:55+5:302024-07-28T19:15:03+5:30
नागपूर जिल्ह्यात पावसाची झड सुरूच, प्रशासन सतर्क . प्रशासन सतर्क असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर: नागपूर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसाची झड सुरू आहे. रविवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता. परिणामी धरणातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तोतलाडोह, खेकरानाला व निम्म वेणा वडगाव धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. प्रशासन सतर्क असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी दिवसभर पावसाची झड सुरू होती. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास निम्म वेणा वडगाव धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आले. एकूण ८३४.३ दशलक्ष घनमीटर(दलघमी) इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्याचप्रमाणे दुपारी ४ वाजता रामटेक तालुक्यातील तोतलाडोह धरणाचे सर्व १४ दरवाजे उघडण्यात आले.
या धरणातून एकूण ४४३.५७६ दलघमी इतके पाणी सोडण्यात आले. सावनेर तालुक्यातील खेकरानाला धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले असून १४.०९८ दलघमी इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. पावसाची झड सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा वाढल्याने त्यातून पुन्हा पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.