पेंचच्या खुर्सापारचे पर्यटन क्षेत्र वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 10:55 AM2021-10-20T10:55:30+5:302021-10-20T12:40:34+5:30
खुर्सापारला लागून असलेल्या नागपूर प्रादेशिक वनविभागाच्या पवनी आणि देवलापार वन परिक्षेत्रातील काही रुट पर्यटनासाठी समाविष्ट करण्यात येणार आहेत.
योगेंद्र शंभरकर
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी पर्यटकांचा वाढता कल पाहता रुट वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पेंचच्या सिल्लारी आणि खुर्सापार गेटवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे प्राथमिक टप्प्यात खुर्सापार क्षेत्रात भ्रमण मार्ग वाढविण्याची याेजना पेंच प्रबंधनाकडून आखली जात आहे.
साधारणत: काेणत्याही व्याघ्र प्रकल्पात अंतर्गत सफारीसाठी ३० ते ४० किलाेमीटर लांब भ्रमणमार्ग निर्धारीत केले जातात. मात्र खुर्सापारचे भ्रमणमार्ग लहान आहेत. उल्लेखनीय म्हणजे खुर्सापार जंगल पेंच व्याघ्र प्रकल्पाचा काेर एरिया आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या नियमानुसार काेणत्याही व्याघ्र प्रकल्पातील काेर एरियात २० टक्क्याहून अधिक क्षेत्रात पर्यटन केले जाऊ शकत नाही. अशा स्थितीत खुर्सापारला लागून असलेल्या नागपूर प्रादेशिक वनविभागाच्या पवनी आणि देवलापार वन परिक्षेत्रातील काही रुट पर्यटनासाठी समाविष्ट करण्यात येणार आहेत. वन अधिकाऱ्यांच्या मते व्याघ्र प्रकल्पास लागून असलेले दाेन्ही प्रादेशिक वनपरिक्षेत्र वन्यप्राण्यांसाठी उत्तम आहेत. त्यामुळे पवनी व देवलापार रुटही पर्यटनासाठी समाविष्ट केले जाणार आहेत. मात्र संबंधित वनक्षेत्रावर प्रादेशिक विभागाचेच नियंत्रण राहील आणि केवळ पर्यटन रुट वाढविण्यास मदत मिळेल.
सायकलिंगचीही योजना
सूत्राच्या माहितीनुसार पेंचला लागून असलेल्या पवनी क्षेत्रात पर्यटकांसाठी सायकल सफारीही सुरू केली जाऊ शकते. यासाठी नुकतेच एक सर्वेक्षणही करण्यात आले हाेते.
रुट वाढविण्यात येत आहेत
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी सांगितले, पेंचच्या खुर्सापारजवळ प्रादेशिक वन विभागांतर्गत येणाऱ्या पवनी आणि देवलापार वन परिक्षेत्राचे रुट पर्यटनासाठी उपयुक्त आहेत. या क्षेत्रावर प्रादेशिक विभागाचेच नियंत्रण राहील. केवळ पर्यटन रुट वाढविले जात आहेत.