पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार

By Admin | Published: July 30, 2016 02:38 AM2016-07-30T02:38:46+5:302016-07-30T02:38:46+5:30

विदर्भात आणि विदर्भालगत आठ व्याघ्र प्रकल्प व दोन अभयारण्य असल्यामुळे नागपूरला देशाची व्याघ्र राजधानी संबोधले जाते.

Tourism will be encouraged | पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार

पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार

googlenewsNext

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : ‘टायगर रॉक’चे उद्घाटन, ग्रामीण युवकांना रोजगार
नागपूर : विदर्भात आणि विदर्भालगत आठ व्याघ्र प्रकल्प व दोन अभयारण्य असल्यामुळे नागपूरला देशाची व्याघ्र राजधानी संबोधले जाते. या ठिकाणी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून काही योजनाही दाखल केल्या आहेत. त्याचा फायदा देशविदेशातील पर्यटकांना होणार असून त्या भागातील ग्रामीण युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स चौक, सिव्हिल लाईन्स येथे ‘नागपूर-देशाची व्याघ्र राजधानी’ असा उल्लेख असलेल्या फेरो सिमेंटच्या दगडावर फायबर रेनफोर्स प्लास्टोने बनविलेल्या वाघांच्या दोन प्रतिकृतींच्या ‘टायगर रॉक’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
आयोजन सिव्हिल लाईन्स असोसिएशन नागपूर आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या समारंभात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक देवा उसरे, विलास काळे, कुमार काळे, सिव्हिल लाईन्स असोसिएशनचे अध्यक्ष सीए हेमंत लोढा, उपाध्यक्ष अनसूया काळे-छाब्रानी व अ‍ॅड. संजय किनखेडे, सचिव विक्रम नायडू, कोषाध्यक्ष सीए राजेश मुंधडा, अजय पाटील, संदीप ड्वेलर्स प्रा.लि.चे अनिल अगरवाला, गौरव अगरवाला प्रामुख्याने उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, नागपूरला वाघापूर असे म्हटले जाते. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात ३५० पेक्षा जास्त वाघ आहेत. त्यामुळे देशविदेशातील पर्यटक विदर्भाकडे आकर्षित होत आहेत. या प्रकल्पाचा सर्वांगीण विकास करून पर्यटकांना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘टायगर रॉक’ नागपूरचे आकर्षण ठरणार आहे.
या समारंभात सिव्हिल लाईन्स असोसिएशनचे कार्यकारी समिती सदस्य अ‍ॅड. निशांत गांधी, अ‍ॅड. अनिल मूलचंदानी, राजेश केडिया, किशोर जिचकार, शीला तेनाय, सुनिता सुराणा, डॉ. दीपा जमवाल, कृष्णा राठी, प्रदीप माहेश्वरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘टायगर रॉक’ आकर्षणाचे केंद्र
टायगर रॉकची निर्मिती संदीप ड्वेलर्स प्रा.लि. (एसडीपीएल) या कंपनीने सामाजिक उपक्रमांतर्गत केली आहे. निर्मितीसाठी अडीच महिने लागले. यासाठी ७ लाख रुपयांचा खर्च आला. फेरो सिमेंटने तयार केलेल्या दगडावर फायबर रेनफोर्स प्लास्टोने तयार केलेल्या वाघांच्या दोन प्रतिकृती बसविण्यात आल्या आहे. ‘टायगर रॉक’ नागपूरचे आकर्षण ठरेल, असा विश्वास ‘एसडीपीएल’चे संचालक गौरव अगरवाला यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Tourism will be encouraged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.