'कुवारा भिवसन' नावालाच पर्यटनस्थळ; ना राहण्याची सोय ना जेवणाची व्यवस्था, मौजमजा कसली त्रासच जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 06:31 PM2023-02-16T18:31:36+5:302023-02-16T18:33:25+5:30
निसर्गसानिध्य लाभलेले हे उत्तम पर्यटनस्थळ असले तरी त्याचा म्हणावा तसा विकास नाही
नागपूर : पारशिवनी तालुक्यातील कुवारा भीवसन हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे. येथे पुरातन मंदिर असून, हे सुंदर पर्यटनस्थळही आहे. पेंचच्या कुशीत वसलेले, वनराई, सभोवताल डोंगरदऱ्या आणि मधोमध तलाव उत्तम निसर्गसानिध्य लाभलेले हे उत्तम पर्यटनस्थळ असले तरी त्याचा म्हणावा तसा विकास नाही.
पारशिवनीपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्थळी पोहोचण्यासाठी पक्का एकेरी डांबरी मार्ग आहे. पेंच मार्गावरील या ठिकाणी असलेल्या वनराईमुळे आणि तलावामुळे अनेकदा वन्य जीवांचाही वावर असतो. दर्शनासोबतच अनेकजण पार्ट्या करण्यासाठी आणि मौजमजेसाठीही या ठिकाणी येतात. यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची आणि भाविकांची वर्दळ दिसून येते.
पर्यटनस्थळ केवळ नावालाच
आदिवासी समाजाचे दैवत असलेले हे मंदिर पुरातन आहे. श्रद्धेपोटी दरवर्षी हजारे भाविक येथे दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात. दरवर्षी हनुमान जयंतीला येथे दहा दिवसांची यात्रा भरते. परिसरातील नागरिकांसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथून हजारो भाविक यात्रेसाठी आणि नवस फेडण्यासाठी येत असतात. सुंदर निसर्गसानिध्य लाभलेले हे उत्तम पर्यटनस्थळही ठरू शकते. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने फारसा विचारच झाला नाही.
या सुविधा कधी मिळतील?
राहण्याची : पारशिवनी-पेंच मार्गावर हे स्थळ असले तरी येथे पर्यटकांना राहण्यासाठी उत्तम सोय नाही. खानपानासाठी तसेच राहण्यासाठी हॉटेल्स नाहीत. राज्य सरकारकडून मिळालेल्या फंडातून साडेचार वर्षांपूर्वी यात्रा निवास उभारण्यात आले आहे. मात्र, त्यातही म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. त्यामुळे दूरवरून येणारे पर्यटक येथे मुक्काम करणे टाळतात.
स्वच्छतागृह : पर्यटकांच्या सोईसाठी सात ते आठ वर्षांपूर्वी येथे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. मात्र, ते पर्यटकांच्या अपेक्षेनुरूप नाहीत. त्यांची म्हणावी तशी स्वच्छता नसते.
रस्ता : येथे पोहोचण्यासाठी पारशिवणीवरून पक्का डांबरी मार्ग आहेत. मात्र, परिसरात फिरण्यासाठी अंतर्गत उत्तम रस्ते नाहीत.
पिण्याचे पाणी : पर्यटकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर बांधण्यात आली असून, त्यावर पंप बसवून पाण्याची तसेच स्वयंपाकाच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्यासाठी शुद्ध आरओचे पाणी येथे नाही. उपलब्ध पाण्यावरच गरज भागवावी लागले.
जिकडे तिकडे केवळ कचरा
परिसरात मोठ्या प्रमाणावर पार्ट्या होतात. त्यामुळे अस्वच्छता कायम दिसते. म्हणावी तशी स्वच्छता केली जात नाही. जिकडे तिकडे केरकचरा पडलेला दिसतो.
सुरक्षेचाही आनंदी आनंद
सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात म्हणावी तशी काळजी घेतलेली दिसत नाही. सुरक्षा गार्डही परिसरात नाहीत. वाहनांच्या पार्किंगसाठी नावापुरतीच सुरक्षा आहे. तलावामध्ये बोटिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात येतात.
पर्यटकांच्या पदरी निराशा
पर्यटनासाठी हे उत्तम स्थळ ठरू शकते. मात्र, कसल्याही सुविधा नसल्याने पर्यटक थांबत नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीनेही फारशी काळजी घेतलेली दिसत नाही.
- रमेश चांदूरकर, नवेगाव खैरी
आदिवासी समाजबांधवांचे हे श्रद्धास्थान असले तरी म्हणाव्या तशा सोईसुविधा या पर्यटनस्थळावर उपलब्ध नाहीत. अन्य राज्यांतूनही पर्यटक येथे श्रद्धेपोटी येत असले तरी निवासाचीही चांगली व्यवस्था नाही.
- सागर सायरे, पारशिवनी