शहरातील तलाव होणार पर्यटन स्थळे
By Admin | Published: May 1, 2016 02:59 AM2016-05-01T02:59:45+5:302016-05-01T02:59:45+5:30
शहरातील मध्य नागपुरात असलेले लेंडी व नाईक तलाव तसेच सोनेगाव व गांधीसागर या चारही तलावांच्या सौंदर्यीकरणासाठीचे....
लेंडी, नाईक, सोनेगाव व गांधीसागरचा समावेश : पालकमंत्र्यांनी दिल्या प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना
नागपूर : शहरातील मध्य नागपुरात असलेले लेंडी व नाईक तलाव तसेच सोनेगाव व गांधीसागर या चारही तलावांच्या सौंदर्यीकरणासाठीचे प्रस्ताव पर्यटनाच्या दृष्टीने तयार करा. यासाठी लागणारा निधी पर्यटन विभागाकडून आपण उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
रविभवनात आमदार विकास कुंभारे व अन्य नागरिकांच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. लेंडी व नाईक तलावासंदर्भात बोलताना आमदार विकास कुंभारे यांनी सांगितले की, ती६न वर्षापासून आपण पाठपुरावा करीत आहोत. लेंडी तलावाचे सर्वेक्षण झाले. या तलावाशेजारी झोपडपट्टी होती. झोपडीवाल्यांनी गुंडांना आपल्या जागा विकल्या. आता येथे गुंडागिरी सुरू आहे. तलावाच्या शेजारी व जागेवर असलेले अतिक्रमण काढले जात नाही. अतिक्रमण काढण्यासाठी मनपाला पत्र पाठवले पण कारवाई झाली नाही. मूळ जागा नझुलची आहे. लोकांनी बांधकामे केली आहेत पण नझुलनेही अतिक्रमण हटवले नाही. किमान २००० नंतरचे अतिक्रमण तरी हटवायला हवे होते. जिल्हाधिकाऱ्यांकडेही यासाठी पत्र व्यवहार केला.
या संदर्भात मनपाचे सहायक आयुक्त राऊत यांनी सांगितले की, नगर भूमापन अधिकाऱ्यांनी तलावाचे सीमांकन करून द्यावे. पण तहसिलदारांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. या तलावाची एकूण २६ एकर जागा असून त्यापैकी ८ एकर जागेवर तलाव आहे. उर्वरित जागेवर अतिक्रमण आहे. त्यामुळे या तलावाचा सौंदर्यीकरणाचा ९ कोटीचा विकास आराखडा तयार असूनही त्याची अंमलबजावणी करता येत नाही. अनेकांनी या तलावात ड्रेनेज लाईनही सोडल्या आहेत. त्यामुळे तलावाचे पाणी अत्यंत घाण झाले आहेत. २००० नंतरचे अतिक्रमण काढल्यानंतर विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे पालकमंत्री म्हणाले.
नाईक तलाव हा एकूण ४२ एकर जागेवर असून ही जमीन नगरनाईक काळे यांची जागा आहे. ८ एकरवर तलाव असून उर्वरित जागा अतिक्रमणाने व्यापली आहे. नाईक तलावाच्या कंपाऊंड वॉलचे अर्धे कामही झाले आहे. तलावात ज्यांची घरे होती त्यांना घरे दिली आहेत. पण लेंडी तलावाचे घाण पाणी नाईक तलावात सोडले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. भोसलेकालीन हा तलाव अत्यंत सुंदर होता.
यावर पालकमंत्री म्हणाले सौंदर्यीकरण, गाळ काढणे, स्वच्छता करणे, गडर लाईन अन्य भागातून वळवणे असा प्रस्ताव तयार करा. दोन्ही तलावाबाबत मनपा प्रशासनात उदासीनता असल्याचे आढळले.
शहरातील लेंडी, नाईक, सोनेगाव व गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करून पर्यटन विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करा. पर्यटन विभागाकडून या तलावांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने निधी मिळवून सौंदर्यीकरण करू. (प्रतिनिधी)