गोरेवाडातील पर्यटकांत बिबट्याची दहशत
By admin | Published: January 30, 2017 02:49 AM2017-01-30T02:49:18+5:302017-01-30T02:49:18+5:30
सध्या गोरेवाडा येथे जंगल सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये येथील बिबट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली
जंगलातील बिबट्यांची संख्या वाढली : ‘सायकल सफारी’चा प्रतिसाद थंडावला
नागपूर : सध्या गोरेवाडा येथे जंगल सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये येथील बिबट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. यामुळे मागील वर्षीपासून येथे सुरू करण्यात आलेल्या ‘सायकल सफारी’ ला मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. मात्र त्याचवेळी गोरेवाडातील वन अधिकारी पर्यटकांचा प्रतिसाद वाढतच असल्याचा दावा करीत आहे. माहिती सूत्रानुसार मागील काही दिवसांत या जंगलातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या येथे सुमारे तीन ते चार बिबट्यांचा अधिवास आहे. ‘सायकल सफारी’साठी जाणाऱ्या अनेक पर्यटकांना ते दिसतात. शिवाय वन कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान ते दिसून येतात. या जंगलाच्या सभोवताल सुरक्षा भिंत तयार करण्यात आली आहे. त्यामुळे त्या बिबट्यांची येथे कोंडी होत असल्याचे बोलले जात आहे. वन विभागाने मागील वर्षीपासून येथे ‘सायकल सफारी’ चा प्रयोग सुरू केला आहे. त्यासाठी येथे सहा नवीन सायकली खरेदी करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना त्यापैकी पाच सायकली सफारीसाठी दिल्या जातात, तसेच उर्वरित एका सायकलीवर गाईड असतो. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्या सहा सायकलीपैकी दोन सायकलीमध्ये बिघाड आला आहे. त्यामुळे सध्या चारच सायकली सुरू असून, त्यापैकी पर्यटकांना तीन सायकली दिल्या जात आहे. सध्या येथील सफारीसाठी खासगी सायकलींना प्रवेश दिला जात नाही. मात्र वन विभाग भविष्यात येथे खासगी सायकलींनासुद्धा प्रवेश देण्यासंबंधी विचार करीत असल्याची माहिती गोरेवाडाचे सहायक वनसंरक्षक (एसीएफ) बुराटे यांनी दिली. (प्रतिनिधी)
पिंजऱ्यातून पळालेला बिबट सापडेना!
मागील २५ दिवसांपूर्वी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमधील पिंजऱ्यातून एक बिबट पळाल्याची घटना पुढे आली होती. या घटनेला आता महिना लोटत असताना अजूनपर्यंत त्या बिबट्याचा कुठेही शोध लागलेला नाही. शिवाय या प्रकरणी अजूनपर्यंत कोणतीही कारवाईसुद्धा झालेली नाही. विशेष म्हणजे, नागपुरात वन विभागाचे मुख्यालय आहे. येथे राज्याच्या वनबल प्रमुखांसह शेकडो वरिष्ठ वन अधिकारी बसतात. मात्र असे असताना या एवढ्या गंभीर घटनेची अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही. एका पिंजऱ्यातून बिबट अचानक गायब होतो, आणि वन विभाग मागील एक महिन्यापासून गप्प बसतो, यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जाणकारांच्या मते, आतापर्यंत संबंधित वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु मुख्यालयातील काही वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे अशा घटनांवर पडदा टाकण्याचे काम केले जात आहे.