शेतकरी दाम्पत्याने घेतले विषारी द्रव्य
By admin | Published: October 22, 2016 02:53 AM2016-10-22T02:53:39+5:302016-10-22T02:53:39+5:30
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी द्रव्य घेतल्याचा प्रकार कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडला.
पतीचा मृत्यू : पत्नीची प्रकृती धोक्याबाहेर
कोंढाळी : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी द्रव्य घेतल्याचा प्रकार कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडला. यामध्ये पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेमुळे मूर्ती येथे हळहळ व्यक्त होत आहे.
जगन रामचंद्र खवसे (४०) आणि रेखा जगन खवसे (३५) असे या शेतकरी दाम्पत्याचे नाव असून जगन यांचा उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाला. दिव्यांग असलेल्या जगन यांच्या कुटुंबाच्या नावे मूर्ती - चंदनपार्डी मार्गावर सहा एकर शेती आहे. यामध्ये जगन यांच्यासह दोन भाऊ मोरेश्वर आणि रामेश्वर तसेच आईचा हिस्सा आहे. या तिन्ही भावांची अंतर्गत हिस्सेवाटणी झालेली असून तिघेही स्वतंत्रपणे शेती करीत. मात्र तीन वर्षांपासून समाधानकारक उत्पन्न न झाल्याने जगन हे गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. निसर्गाचे दुष्टचक्र, वन्यप्राण्यांचा त्रास यामुळे यावर्षीही समाधानकारक उत्पन्न होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यातच बँकेचे कर्ज आणि गावातील काही लोकांकडून घेतलेले हातउसणे यामुळे जगन हे सतत विचारचक्रात होते.
बँकेचे कर्ज आणि हातउसणे यावर्षीही फेडता येणार नसल्याने निराश झालेल्या जगन यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पत्नी रेखासह राहत्या घरी विषारी द्रव्य घेतले. त्यावेळी नवव्या वर्गात असलेली मुलगी साधना आणि सहावीत असलेला दीपक ही दोन्ही मुले घरी नव्हते. विषारी द्रव्य घेतल्याची बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर दोघांनाही लगेच काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूरला मेडिकलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लगेच मेडिकलमध्ये हलविले. तेथे दोघांवरही उपचार सुरू असताना सायंकाळी ६.५० वाजताच्या सुमारास जगनचा मृत्यू झाला. पत्नी रेखा हिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे. (वार्ताहर)