१५० विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: January 23, 2017 01:44 AM2017-01-23T01:44:25+5:302017-01-23T01:44:25+5:30
स्थानिक माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
काटोल : स्थानिक माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी डोनट, पेस्ट्री, चोकोबार आदी खाद्यपदार्थ खाल्ले. यातून १५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, बहुतांश विद्यार्थी ४ ते १० वर्षे वयोगटातील आहेत. सर्व विद्यार्थ्यांवर काटोल येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती डॉ. अमोल करांगळे व डॉ. राकेश वानखेडे यांनी दिली.
माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये आयोजित फूड फेस्टिव्हलसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी डोनट, पेस्ट्री, चोकोबार यासह अन्य खाद्य पदार्थांवर मनसोक्त ताव मारला. त्यानंतर शनिवारी यातील काही विद्यार्थ्यांना ताप व डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाला. त्यामुळे पालकांनी या विद्यार्थ्यांना स्थानिक बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल करांगळे व डॉ. राकेश वानखेडे यांचेकडे उपचारासाठी नेले. या विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थातून विषबाधा झाल्याचे निदर्शनास येताच त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
या संदर्भात डॉ. अमोल करांगळे व डॉ. राकेश वानखेडे यांनी संयुक्तरीत्या सांगितले की, शनिवारपासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांच्याकडे १५० विद्यार्थी उपचारासाठी आले. या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच त्रास दिसून आला. हा प्रकार अन्नातून विषबाधा झाल्यामुळेच होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. सर्व खाद्यपदार्थ काटोल शहरातील बिकानेर मिष्ठान्न भंडार येथून आणले असल्याने त्याचे मालक अशोक राजपुरोहित यांनाही विचारणा केली. त्यांनी सांगितले, माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचा आॅर्डर मिळाला होता. डोनट व पेस्ट्री गुरुवारी सकाळी ६ वाजता तयार करून ती पुरविण्यात आली होती.