विषप्राशन, हृदयविकारावरील चाचणी बंद

By admin | Published: July 10, 2017 01:41 AM2017-07-10T01:41:40+5:302017-07-10T01:41:40+5:30

वैद्यकीयशास्त्रात उपचाराची पहिली पायरी त्या रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान होणे असते.

Toxicity, stop the heart attack | विषप्राशन, हृदयविकारावरील चाचणी बंद

विषप्राशन, हृदयविकारावरील चाचणी बंद

Next

मेडिकल : तातडीच्या उपचारावरच प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीयशास्त्रात उपचाराची पहिली पायरी त्या रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान होणे असते. म्हणूनच मेडिकलमध्ये पॅथालॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री या स्वतंत्र लॅब आहेत. या तिन्ही लॅब मिळून ६० वर डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. विशेष म्हणजे, नुकतेच अद्ययावत यंत्रसामूग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे असताना गेल्या दीड महिन्यांपासून हृदयविकाराच्या झटक्याची चाचणी ‘सीपीके-एमबी’ तर विषप्राशन केलेल्या रुग्णाच्या शरीरातील विषाची तीव्रता माहीत करून घेणारी ‘कोलाईनइर्स्टस’ या दोन महत्त्वाच्या चाचण्या बंद पडल्या आहेत. परिणामी, मेडिकलमधील रुग्णाच्या तातडीच्या उपचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रुग्णांच्या चाचण्यांची गुणवत्ता राखणे (क्वॉलिटी कंट्रोल), त्याची फेर पडताळणी (क्रॉस चेक) करणे व २४ तास सहायक प्राध्यापकांच्या देखरेखेखाली नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतला. यामुळे चाचण्यांमध्ये अहवालामध्ये सुसूत्रता आली आहे. रुग्णांचा त्रासही कमी झाला. परंतु अनेक महत्त्वाच्या चाचण्या रुग्णालयात होणे अचानक बंद होत असल्याने व महिनोन्महिने त्या बंदच राहत असल्याने याचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे.

हृदयविकाराच्या रुग्णांवर कसा होणार उपचार
मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागात हृदयविकाराचे दहावर गंभीर रुग्ण येतात. यातील तीन ते चार रुग्णांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला असतो. याची तपासणी करण्यासाठी ‘सीपीके-एमबी’ ही महत्त्वपूर्ण चाचणी असते. परंतु दीड महिन्यांपासून ही चाचणी करणेच बंद आहे. रुग्णांना बाहेरून ही तपासणी करण्यास सांगितले जात आहे. या धावपळीत वेळ जात असल्याने तातडीचे उपचारापासून रुग्ण वंचित राहत असल्याचे वास्तव आहे. या शिवाय तीन-चार दिवसांपूर्वी हृदयात दुखले असेल आणि आज उपचारासाठी आला असेल त्याची माहिती घेण्यााठी असलेली ‘ट्रोपोनीन -टी’ ही देखील चाचणीही बंद असल्याची माहिती आहे.
विष घेतलेल्या रुग्णांतही उपचारात उशीर
विष प्राशन केलेल्या रुग्णाच्या शरीरातील विषेची तीव्रता माहिती करून घेणारी ‘कोलाईनइर्स्टस’ ही चाचणी गेल्या महिन्यापासून बंद आहे. बाहेर ही चाचणी महागडी आहे. यामुळे काही गरीब रुग्णांचे नातेवाईक अडचणीत येतात, तर काहींवर पदरमोड करून या तपासण्या कराव्या लागतात.
खासगीमधून तपासण्या कधी होणार बंद?
एकीकडे शासन मेडिकलच्या अद्यावत यंत्रसामग्रीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते, मात्र प्रशासन त्या यंत्रावरील चाचण्या सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत नाही, याचे हे बोलके चित्र आहे. या उलट मेडिकल चौकातील केवळ दहा बाय पंधराच्या खोलीतील एका खासगी ‘लॅब’मध्ये एक तंत्रज्ञ मेडिकलमध्ये न होणाऱ्या सर्व चाचण्या करत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

Web Title: Toxicity, stop the heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.