श्वास सुरू असताना श्वसननलिका कापून नंतर जोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 AM2021-09-08T04:11:36+5:302021-09-08T04:11:36+5:30
नागपूर : रुग्णाची श्वसननलिका २ मिलिमीटरपर्यंत अरुंद झाली होती. रुग्णाला श्वास घेणे कठीण झाले होते. या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी दिल्लीला ...
नागपूर : रुग्णाची श्वसननलिका २ मिलिमीटरपर्यंत अरुंद झाली होती. रुग्णाला श्वास घेणे कठीण झाले होते. या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी दिल्लीला जाण्याचा सल्लाही देण्यात आला होता; परंतु नागपूरच्या डॉक्टरांनी श्वसननलिकेचा प्रभावित झालेला भाग काढून, रुग्णाचा श्वास सुरू असताना श्वसन नलिका एकमेकांना जोडण्याची दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी केली.
अमरावती येथील एका ३० वर्षीय तरुणाला अपघातामुळे डोक्याला गंभीर इजा झाली. तेथीलच एका रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेदरम्यान व्हेंटिलेटरची नळी घशापर्यंत टाकण्यात आली; परंतु नंतर व्हेंटिलेटरची नळी काढण्यातच आली नाही. फार काळ श्वसननलिकेत नळी राहिल्यामुळे श्वास नलिका आकुंचित पावली व ती तेथेच अडकली. नळी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शक्य झाले नाही. त्याला शस्त्रक्रियेसाठी दिल्लीत जाण्याचा सल्ला देण्यात आला; परंतु रुग्णाच्या नातेवाइकांनी नागपूर गाठले. क्रिम्स हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी ब्रोंकोस्कोपी केली. श्वसननलिकेला सूज आल्याचे व पस जमा झाल्याचे निदान केले. पस व नळी काढून प्रतिजैविके औषधी देण्यात आली. १५ दिवसांनी पुन्हा रुग्णाला तपासले असता श्वसननलिकेचा घेर केवळ २ मिलिमीटरचा झाल्याचे दिसून आले. यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते; परंतु गुंतागुंतीची व दुर्मीळ शस्त्रक्रियेचा रुग्णाचा जीवाला धोका होता.
-‘ट्रॅकियल रिसेक्शन ॲन्ड, एंड टू एंड अनॅस्टमोसिस’ शस्त्रक्रिया
डॉ. अरबट यांनी सांगितले, व्हेंटिलेटरच्या नळीमुळे श्वसननलिकेचा एक सेंटिमीटरचा भाग प्रभावित झाला होता. हा भाग काढून टाकण्यासाठी रुग्णाचा श्वासोच्छ्वास सुरू असताना श्वास नलिका कापण्याची प्रक्रिया करणे व श्वासनलिकेचे दोन्ही भाग जोडणे अत्यंत क्लिष्ट व धोकादायक होते. मात्र, शल्यचिकित्सक डॉ. गोपाल गुर्जर यांनी आपल्या अनुभव, कौशल्य व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. याला वैद्यकीय भाषेत ‘ट्रॅकियल रिसेक्शन ॲन्ड एंड टू एंड अनॅस्टमोसिस’ शस्त्रक्रिया म्हणतात. यात श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. परिमल देशपांडे व डॉ. स्वप्नील बाकमवार यांनी सहकार्य केले.
-नागपुरातही आता दुर्मीळ शस्त्रक्रिया
नागपूर हे मेडिकल हब होत आहे. सर्वच प्रकारच्या गुंतागुंतीच्या व दुर्मीळ शस्त्रक्रिया नागपुरात होऊ घातल्या आहेत. या रुग्णामध्ये श्वसननलिकेचा एक भाग काढून त्याला जोडणे हे अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे होते. डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. विशेष म्हणजे, नागपुरात येण्यापूर्वी रुग्णाला दिल्लीला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.
-डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ