मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला; तीन ठार तर दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 07:48 PM2020-12-25T19:48:31+5:302020-12-25T19:49:04+5:30
Accident : सेलोटी-बोर्डकला शिवारातील घटना
भिवापूर : लाकडे आणण्यासाठी मजुरांना घेऊन वेगात जात असलेला ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. यात ट्रॅक्टरचालक व दाेन मजूर अशा तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दाेन मजूर गंभीर जखमी झाले. सर्व जण भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सेलाेटी-बाेर्डकला मार्गावर शुक्रवारी (दि. २५) दुपारी घडली.
मृतांमध्ये ट्रॅक्टरचालक राजेश रामचंद्र मोटघरे (२५, रा. बेटाळा, ता. पवनी, जिल्हा भंडारा), श्रीकृष्ण दामोदर नागोसे (३०) व अमृत हगरू मेश्राम (५५) दाेघेही रा. सिरसाळा, ता. पवनी, जि. भंडारा या तिघांचा समावेश असून, संतोष कावळे (२१) व मोहित वरठी (१८) दाेघेही रा. रा. बेटाळा, ता. पवनी, जि. भंडारा अशी गंभीर जखमींची नावे आहेत. हे सर्व जण एमएच-३६/झेड-१९३७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने लाकडे आणण्यासाठी जात हाेते. दाेन मजूर चालकाजवळ तर दाेघे ट्राॅलीत बसले हाेते.
चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रॅक्टर सेलाेटी शिवारात उलटला. त्यात चालक व दाेघे ट्रॅक्टरच्या इंजिनखाली दबले गेले तर दाेघे फेकले गेले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी दबलेल्या तिघांना बाहेर काढले. ताेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे पाेलिसांनी दाेघांना उपचारासाठी तर तीन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. दाेन्ही जखमींवर प्रथमाेपचार करून त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्या मार्गदर्शनात भिवापूर पाेलीस करीत आहेत.
गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता
अपघात हाेताच परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. तिन्ही मृतांच्या शरीरावर फारशा गंभीर जखमा नव्हत्या. मात्र, त्यांच्या नाकाताेंडात माती गेली हाेती. त्यामुळे त्या तिघांचाही मृत्यू गुदमरून झाला असावा, अशी शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. उत्तरीय तपासणी प्रक्रिया शनिवारी (दि. २६) सकाळी केली जाणार असल्याचे डाॅ. शांतीदास लुंगे यांनी सांगितले