व्यापाऱ्यांनी स्वत:हून काढले अतिक्रमण
By Admin | Published: March 20, 2017 02:04 AM2017-03-20T02:04:43+5:302017-03-20T02:04:43+5:30
सीताबर्डीतील मोदी नं. २ मध्ये सातत्याने वाहतुकीची समस्या भेडसावत होती. व्यापाऱ्यांनी आपल्या सोईनुसार रस्त्यावर अतिक्रमण केल्याने
मोदी नं. २ च्या व्यापाऱ्यांचा पुढाकार : वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाय
नागपूर : सीताबर्डीतील मोदी नं. २ मध्ये सातत्याने वाहतुकीची समस्या भेडसावत होती. व्यापाऱ्यांनी आपल्या सोईनुसार रस्त्यावर अतिक्रमण केल्याने या गल्लीतून वाहतूक करणे अतिशय अवघड होते. येथून एखादे तीनचाकी वाहन जरी गेल्यास वाहतुकीचा खोळंबा होत होता. अतिक्रमणामुळे पायी चालणेसुद्धा कठीण झाले होते. दररोजची होणारी तुतुमैमै लक्षात घेता, मोदी नं. २ च्या व्यापाऱ्यांनी स्वत:च अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. आपल्या दुकानाची सीमा ठरवून घेत, वाहतुकीस रस्ता मोकळा केला. अतिक्रमण काढण्यास व्यापाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
सीताबर्डीतील मोदी नं. २ ही व्यापारी गल्ली आहे. या गल्लीच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहे. व्यवसायाचा व्याप लक्षात घेता आपल्या सोईनुसार व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून रस्तासुद्धा व्यापून घेतला होता. त्यामुळे गल्ली अगदी निमुळती झाली होती. पायी चालणाऱ्यांनासुद्धा येथून सहज चालणे कठीण झाले होते. एखादे प्रवासी अथवा मालवाहतूक वाहन येथून गेल्यास, वाहतुकीचा जॅम लागून जात होता. येथे दररोज ही स्थिती बघायला मिळायची. त्याचा त्रास नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनासुद्धा होत होता. व्यापाऱ्यांची दररोज कुणासोबत तरी तुतुमैमै होत होती. शेवटी मोदी नं. २ च्या व्यापाऱ्यांनी स्वत: गल्लीतील वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेतला. सर्व व्यापाऱ्यांनी सभा घेऊन आपापले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने या निर्णयाचे स्वागत केले. प्रत्येकाने आपापल्या दुकानाची सीमा ठरवून पिवळे पट्टे मारले. व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने आज ही गल्ली अतिक्रमणमुक्त झाली आहे. या सभेला पुष्पक खापेकर, संजय मेश्कर, मंगेश डोमाळे, व्यंकटेश नायडू, पराग भेंडे, सुरेश राव, अजय पाटणे, प्रदीप मिश्रा, शंकर मुरारका, गोपाल चांडक, गोपु चौरसिया आदी व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)