नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याचे साडेआठ लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 08:33 PM2019-10-14T20:33:13+5:302019-10-14T20:35:58+5:30

जुने बसस्थानक परिसरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या अगदी प्रवेशद्वारावर एका तरुण व्यापाऱ्यास गंभीर जखमी करीत चार जणांनी बॅगमधील रोकड जबरीने हिसकावून पोबारा केला.

Traders looted eight and a half lakhs in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याचे साडेआठ लाख लुटले

नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याचे साडेआठ लाख लुटले

Next
ठळक मुद्देउमरेडच्या युनियन बँकेसमोरील घटना : चाकूने भोसकले आणि पळ काढला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड) : जुने बसस्थानक परिसरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या अगदी प्रवेशद्वारावर एका तरुण व्यापाऱ्यास गंभीर जखमी करीत चार जणांनी बॅगमधील रोकड जबरीने हिसकावून पोबारा केला. सुमारे साडेआठ लाख रुपयांची रक्कम आणि काही रकमेचे धनादेश या बॅगमध्ये होते. सोमवारी (दि.१४) सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास भरदिवसा घडलेल्या थरारक घटनाक्रमामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. निकेश महेश तोलानी (३०, रा. सिंधी कॉलनी, उमरेड) असे जखमी झालेल्या तरुण व्यापाऱ्याचे नाव आहे. 


उमरेड मंगळवारी पेठ येथे पूजा एजन्सी या नावाने तोलानी यांचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी निकेश आपल्या बॅगमध्ये दुकानाची रोकड घेऊन काही अंतरावरच असलेल्या युनियन बँकेच्या स्थानिक शाखेकडे दुचाकीने निघाला. सदर बँक ही पहिल्या माळ्यावर आहे. यामुळे रस्त्यालगत वाहन लावून निकेश बॅगेत भरलेली रोकड घेऊन बँकेच्या दिशेने निघाला. 

अशातच प्रवेशद्वारावर आधीच दडून बसलेल्या एका चोरट्याने निकेशला अडविले. त्यानंतर लागलीच दोघांनी मागून येत निकेशला मारहाण केली. बॅग हिसकावण्यासाठी चांगलीच रस्सीखेच झाली. अशातच आणखी चौथ्या चोरट्याने येत धारदार शस्त्राने निकेशवर हल्ला केला. बळजबरीने बॅग हिसकावून चारही चोरटे एकाच दुचाकीवर इतवारी मुख्य मार्गाने पळाले. दुसरीकडे रक्तबंबाळ झालेला निकेश लगतच्याच किराणा दुकानात शिरला. केवळ १० सेकंदाच्या आतच हा थरार घडला. चारही चोरट्यांनी बॅगमध्ये असलेली रोकड पळविली. लागलीच निकेशला एका खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर नागपूर येथे रवाना करण्यात आले. निकेशची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे, पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. एका दुचाकीवर चार जण बसून जात असल्याचे तसेच मारहाणीचे चित्रण पोलिसांना गवसले असून, पुढील तपास सुरू आहे.

नाकाबंदी केली पण...
१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास युनियन बँकेच्या प्रवेशद्वारालगत घडलेल्या या प्रकारानंतर काही सेकंदातच चारही चोरटे इतवारी मुख्य मार्गाच्या दिशेने निघाले. लागलीच पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी नाकांबदी केली. परंतु त्याआधीच चोरटे पसार झाले होते.

Web Title: Traders looted eight and a half lakhs in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.