आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध आज व्यापाऱ्यांचे बाजार बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 12:09 AM2020-08-19T00:09:52+5:302020-08-19T00:24:29+5:30
दुकानांसाठी ऑड-इव्हन पद्धत आणि व्यापाऱ्यांना परवाने व कोरोना चाचणी बंधनकारक करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाविरूद्ध नागपुरातील सर्व व्यापारी संघटनांनी बुधवार, १९ रोजी बंद आंदोलन पुकारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुकानांसाठी ऑड-इव्हन पद्धत आणि व्यापाऱ्यांना परवाने व कोरोना चाचणी बंधनकारक करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाविरूद्ध नागपुरातील सर्व व्यापारी संघटनांनी बुधवार, १९ रोजी बंद आंदोलन पुकारले आहे. बुधवारी सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद राहणार असून व्यवहार होणार नाहीत. आंदोलनात ऑड-इव्हन पद्धत, व्यापाऱ्यांना परवाने आणि कोरोना चाचणी बंधनकारक असू नयेच, अशी मागणी करून विविध व्यापारी संघटना प्रशासनाचे लक्ष वेधणार आहेत. राज्यात केवळ नागपुरातील व्यापाऱ्यांसाठी ऑड-इव्हन पद्धत सुरू असून त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सर्व बाजारपेठा बंद राहणार
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, मनपा आयुक्त मनमानी करून व्यापाऱ्यांवर निर्बंध लादत आहेत. आर्थिक संकटात असलेल्या व्यापाऱ्यांना त्रास देत आहेत. कोरोनाचे संकट वाढतच आहे. अशा स्थितीत आयुक्तांनी व्यापाऱ्यांना त्रास देऊ नये. नागपूर चेंबरऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विष्णू पचेरीवाला म्हणाले, सर्व बंधने व्यापाऱ्यांवर टाकली जातात. त्याचा निषेध म्हणून बुधवारच्या बंद आंदोलनात सर्वच बाजारपेठांमधील व्यापारी सहभागी होणार आहेत. आयुक्तांनी व्यापाऱ्यांचाही विचार करावा. नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, नागपुरातील तीन हजार सराफा व्यापारी संपात सहभागी होतील. ऑड-इव्हन पद्धत, परवाने आणि कोरोना चाचणी या गोष्टी बंधनकारक नकोच. असे आदेश काढून आयुक्तांनी व्यापाऱ्यांना संकटात टाकले आहे.
नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, आयुक्तांनी व्यापाऱ्यांवर जाचक अटी लादू नयेत. त्यांना मुक्तपणे व्यवसाय करू द्यावा. आयुक्तांच्या आदेशामुळे आधीच संकटात असलेला व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. आयुक्तांनी सर्व आदेश मागे घ्यावेत. उद्या चिल्लर किराणा दुकाने बंद राहतील. नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, नाग विदर्भ चेंबरने पुकारलेल्या संपाला आमचा पाठिंबा असून त्यांच्या आवाहनार्थ सर्व मुख्य किराणा बाजारपेठा उद्या बंद राहणार आहे. आयुक्तांचे आदेश व्यापाºयांना मारक असून त्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांनी आदेश मागे घ्यावेत.
व्यापारी कोरोना चाचणी करणार नाहीत
मेहाडिया म्हणाले, आतापर्यंत किती व्यापारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केली, याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण व्यापारी कोरोना चाचणी करणार नाहीत, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. आवश्यकता भासल्यास व्यापारी कोरोना चाचणी करतील, पण आयुक्तांनी ती बंधनकारक करू नये. शिवाय १८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी न केलेल्या व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी मागे घ्यावेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
व्यापाऱ्यांचे विविध ठिकाणी आंदोलन
सकाळी १० वा. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, सिव्हील लाईन्स.
सकाळी १०.३० वा. लोकमत चौक.
सकाळी ११ वा. व्हेरायटी चौक.
सकाळी ११.३० वा. लक्ष्मीभुवन, धरमपेठ.
दुपारी १२ वा. मस्कासाथ, इतवारी.
दुपारी १२.३० वा. सराफा बाजार, शहीद चौकÞ
दुपारी १ वा. नंगापुतळा, होलसेल क्लॉथ मार्केट.
बंद राहणार होलसेल धान्य बाजार
महापालिका आयुक्तांनी व्यापाऱ्यांना परवाना घेण्याचे व व्यापाऱ्यांकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या या आदेशाचा विरोध करण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या आवाहनानुसार इतवारी, कळमना बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. दि होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल व सचिव प्रताप मोटवानी यांनी आयुक्तांच्या आदेशाला तानाशाही असे संबोधून विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धान्य व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात जीवाची पर्वा न करता जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. कुठेही तुटवडा न होऊ देता दरसुद्धा नियंत्रित ठेवले. त्यामुळे आमचा सन्मान करण्याऐवजी नवनवीन आदेश काढून व्यापाऱ्यांना त्रस्त करीत आहेत. आयुक्तांनी आपला निर्णय मागे न घेतल्यास अनिश्चित काळासाठी बाजार बंद ठेवण्यात येईल, असा इशारा असोसिएशनने दिला आहे.