नागपुरात व्यापारी पुत्राचे अपहरण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:21 AM2019-05-20T10:21:39+5:302019-05-20T10:22:47+5:30
तहसीलमधील एका बड्या सुपारी व्यापाऱ्याचा तरुण मुलगा दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला. त्याचे अपहरण करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तहसीलमधील एका बड्या सुपारी व्यापाऱ्याचा तरुण मुलगा दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला. त्याचे अपहरण करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या संशयास्पद अपहरण प्रकरणाचा क्रिकेट सट्ट्यातील लाखोंच्या आर्थिक व्यवहारासोबत संबंध असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, या प्रकारामुळे व्यापारी वर्तुळासोबतच पोलीस दलातही खळबळ निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सदर तरुण इतवारी-गांधीबाग परिसरातील बड्या सुपारी व्यापारी कुुटुंबीयाचा सदस्य आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता तो घरी होता. त्याला त्यावेळी अनेकांचे फोन आले. त्यानंतर तो घाबरलेल्या अवस्थेत घरून पायीच बाहेर पडला. रात्र झाली तरी तो परत आला नाही. त्याचा मोबाईल आणि वाहन घरीच असल्याने त्याचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्न कुटुंबीयांसमोर होता. कुटुंबीयांनी मुलाच्या मित्रांकडे चौकशी केली. काहीच पत्ता-ठिकाणा लागला नाही. त्यामुळे रात्री उशिरा तहसील ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मिसिंगची नोंद घेऊन आपल्या वरिष्ठांना ही माहिती दिली.
प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता मध्यरात्रीपासूनच पोलीस तपासकामी लागले. सदर कुुटुंबीयांच्या घराच्या समोरचे आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले.त्यात तो एकटाच जात असल्याचे दिसून आले. दोन दिवस होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांसोबतच पोलिसही हादरले आहेत. जेवढे जास्त दिवस तेवढा अशा प्रकरणात धोका वाढतो, हे लक्षात आले.
अनेक संशयितांची चौकशी
पोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून काही संशयितांकडे विचारपूस चालविली आहे. मात्र, रविवारी रात्रीपर्यंत त्याच्या संबंधाने कसलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. या कथित अपहरण प्रकरणाचा क्रिकेट सट्ट्यासोबत संबंध असल्याचे सांगितले जाते. चर्चेनुसार, सदर तरुणाने आयपीएलमध्ये लाखोंची लगवाडी केली. प्रारंभी तो मोठी रक्कम जिंकला. नंतर मात्र हरतच गेल्याने त्याच्यावर लाखोंच्या थकीत रकमेचे वसुलीसाठी दडपण आले. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये म्हणून संबंधित कुटुंबीयांनी तसेच पोलिसांनीही कमालीची गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, कुटुंबीयांकडून पाहिजे तशी माहिती दिली जात नसल्याने पोलिसांना बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात अडचण येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने लोकमतला सांगितले.