ट्रेडिंगचा भूलभुलैया: ‘प्रोफेसर गँग’ म्हणजे हिमनगाचे टोक, काम एक-नाव अनेक

By योगेश पांडे | Published: May 21, 2024 11:33 PM2024-05-21T23:33:23+5:302024-05-21T23:33:52+5:30

Nagpur Crime News: शेअर मार्केट व ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांना जाळ्यात ओढून गंडविणारी ‘प्रोफेसर गँग’ हे या घोटाळ्यांचे केवळ एक लहान उदाहरण आहे. ही टोळी म्हणजे हिमनगाचे टोक असून अशा प्रकारचेच काम करणाऱ्या, मात्र वेगवेगळे नाव असलेल्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत.

Trading Labyrinth: 'Professor Gang' Is the Tip of the Iceberg, Work One-Name Many | ट्रेडिंगचा भूलभुलैया: ‘प्रोफेसर गँग’ म्हणजे हिमनगाचे टोक, काम एक-नाव अनेक

ट्रेडिंगचा भूलभुलैया: ‘प्रोफेसर गँग’ म्हणजे हिमनगाचे टोक, काम एक-नाव अनेक

- योगेश पांडे
नागपूर -  शेअर मार्केट व ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांना जाळ्यात ओढून गंडविणारी ‘प्रोफेसर गँग’ हे या घोटाळ्यांचे केवळ एक लहान उदाहरण आहे. ही टोळी म्हणजे हिमनगाचे टोक असून अशा प्रकारचेच काम करणाऱ्या, मात्र वेगवेगळे नाव असलेल्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. काही टोळ्या भारतातूनच तर काही थेट विदेशात बसून स्मार्टफोन्सच्या माध्यमातून नागरिकांवर जाळे टाकण्याचे काम करत आहेत. शेकडो ठगांच्या टोळ्यांची नजर भारतीयांच्या पैशांवर आहे.

‘लोकमत’ने या ठगांच्या ‘मोडस ऑपरेंडी’ला समोर आणल्यानंतर अनेक पीडित नागरिकांनी संपर्क करून त्यांची आपबीती मांडली. अनेक जणांची याच पद्धतीने फसवणूक झाली आहे. मात्र त्यांना फसविणाऱ्या टोळ्यांची व सूत्रधारांची नावे वेगवेगळी आहेत. ‘लोकमत’ने ‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’ या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तथाकथित आर्यन रेड्डी, देविका शर्मा यांनी देशभरात केलेल्या कोट्यवधींच्या फसवणुकीवर प्रकाश टाकला. मात्र अशा पद्धतीची वेगवेगळी नावे घेत नागरिकांची सातत्याने फसवणूक सुरूच आहे.

- ठगांकडे अनेकांचे आधार तपशील

चिंतेची बाब म्हणजे या टोळ्यांकडे गुंतवणूक करणाऱ्यांचे आधारकार्डचे तपशीलदेखील असतात. त्यांच्याशी संबंधित ॲपवर नोंदणी करत असताना या टोळ्या आधारकार्डची माहिती मागतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनादेखील त्यांच्यावर विश्वास बसतो. मात्र फसवणूक झाल्यावरदेखील आरोपींकडे आधारकार्डचे तपशील असतात. त्याच्या आधारे सिमकार्ड घेणे, बँक खाते उघडणे किंवा इतर गैरप्रकार करण्यावर आरोपींचा भर असतो.

- व्हॉट्सॲप क्रमांक एकाच सिरीजचे

या टोळ्यांकडून सर्वसाधारणत: बल्कमध्ये सिम कार्ड्स घेण्यात येतात. एकाच किंवा वेगवेगळ्या नावांवर एकाच सिरीजचे मोबाइल क्रमांक घेण्यात येतात. यात काही सिम कार्ड विक्रेत्यांची मदत घेण्यात येते. या आरोपींच्या व्हॉट्सॲप क्रमांकातील पहिले तीन किंवा पाच आकडे एकाच सिरीजचे असतात. वेगवेगळ्या ग्रुपसाठी वेगवेगळी सिरीज वापरण्यात येते.

- भौगोलिक क्षेत्रनिहाय प्रोफेसरचे बदलते ‘प्रोफाइल’
या गुन्हेगारांकडून भारतीयांच्या मानसिकतेचा चांगलाच अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळेच भौगोलिक क्षेत्रनिहाय सोशल माध्यमांवर जाहिराती करण्यावर त्यांचा भर असतो. त्या क्षेत्राच्या हिशेबानेच ग्रुपचा सूत्रधार व ‘प्रोफेसर’चे नाव निश्चित होते आणि त्याची बोगस ‘प्रोफाइल’देखील तयार करण्यात येते. ‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’ या ग्रुपमध्ये महाराष्ट्रातील अनेक नागरिक होते. महाराष्ट्रात सर्वसाधारणत: दक्षिणेतील राज्यातील लोकांप्रति सन्मानाची भावना असते. त्यामुळे सूत्रधाराचे नाव आर्यन रेड्डी ठेवण्यात आले. तसेच प्रांतवादी आकर्षण लक्षात घेता आर्यन रेड्डी याचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीतून झाल्याचे सांगण्यात आले. त्याचे मोठे प्रोफाईलदेखील ग्रुपवर शेअर करण्यात आले. अशा पद्धतीने प्रत्येक राज्यात वेगवेगळी नावे व वेगवेगळे प्रोफाईल या गुन्हेगारांकडून निवडण्यात येते.

- मानसिकतेचादेखील अभ्यास
या टोळ्यांकडून गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचादेखील अभ्यास करण्यात येतो. एखादा गुंतवणूकदार यांच्या बोलण्याला फसला की त्याच्याशी वैयक्तिक चॅटिंग करणे सुरू होते. त्यानंतर लवकरात लवकर त्याच्याकडून पैसे गुंतविले जावे यासाठी त्याला हातातून संधी निसटण्याची भीती दाखविली जाते. काही तासांत पैसे जमा केले नाही तर स्टॉक्सची किंमत वाढेल व नुकसान होईल, असे सांगण्यात येते. त्याचवेळेला ग्रुपमध्ये टोळीतील सदस्य व बोगस गुंतवणूकदारांकडून त्यांनी त्याच स्टॉक्समध्ये किती पैसे गुंतविले आणि जोरदार नफा कसा झाला हे दर्शविणारे स्क्रीनशॉट्स शेअर होतात. इतरांचा फायदा होत असताना आपण का मागे राहायचे या मानसिकतेतून गुंतवणूक करण्यात येते आणि ती रक्कम कधीच परत येत नाही.

काही बनावट ट्रेडिंग ॲप्स
- झोक्सा
- बीवायएस.कॉम
-सीनव्हेन
-आय सी सर्व्हिसेस
-ॲलिसएक्सए.कॉम
- स्टोरॅक
- प्रायव्हेट प्लेसमेंट ६६
- टायगर ग्लोबल
- व्हीआयपी एक्स्लुझिव्ह

फसवणुकीचे काही ग्रुप्स

- वाय-५ एव्हर कोअर फायनान्शिअल लीडर
- स्टॉक व्हॅनगार्ड व्हीआयपी
- स्टॉक व्हॅनगार्ड १५०
- आर १० स्टॉक एक्सचेंज लर्निंग
- रॉबर्ट मार्टिनेज स्टॉक ग्रुप
- डी-७ अपोलो प्रोडक्ट सोल्युशन्स
- फॉर्च्युन ऑनलाइन क्लब
- टायगर ग्लोबल फायनान्शिअल इन्स्टिट्यूट
- फंड कोअर इन्व्हेस्टर क्लब
- ३२२ स्टॉक व्हिनर

(पुढील भागात : ‘प्रोफेसर गँग’ने गंडविले...डोन्ट वरी...असा परत मिळू शकतो पैसा....सावध हो गुंतवणूकदार राजा )

Web Title: Trading Labyrinth: 'Professor Gang' Is the Tip of the Iceberg, Work One-Name Many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.