नागपूरच्या पोळ्याला भोसलेकाळाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:59 PM2019-08-28T23:59:56+5:302019-08-29T00:01:39+5:30
पोळा हा शेतकऱ्यांचा सण. अनेक वर्षांपासून उत्साहाने तो साजरा होतो. नागपुरातही बैला पोळ्याचे आणि तान्हा पोळ्याचे विशेष आयोजन असते. नागपुरातील या पोळ्याला भोसले काळापासूनची परंपरा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोळा हा शेतकऱ्यांचा सण. अनेक वर्षांपासून उत्साहाने तो साजरा होतो. नागपुरातही बैला पोळ्याचे आणि तान्हा पोळ्याचे विशेष आयोजन असते. नागपुरातील या पोळ्याला भोसले काळापासूनची परंपरा आहे.
प्राचीन काळापासून बैल हा कृषी व्यवस्थेचा आधार आहे. त्यातूनच बैलांच्या सन्मानासाठी आणि त्यांचे ऋण म्हणून पोळा हा वैशिष्ट्यपूर्ण सन संस्कृतीमध्ये आला आहे. आजही ही परंपरा कायम असली तर त्याचा उद्देश मात्र अलिकडे धुसर होत चालला आहे. नागपुरातील ही परंपरा भोसलेकाळापासून चालत आली आहे. त्या काळात पोळा एक पर्व रूपाने मनविला जायचा. भोसलेकाळात त्याला बराच वाव मिळाला.
महाल परिसरात भरायचा मोठा पोळा
भोसलेकाळ सुमारे ३०० वर्षे जुना आहे. नागपुरात पोळ्याची परंपरा भोसलेकाळापासून आहे. मुलांमध्येही बैलांप्रति प्रेम निर्माण व्हावे यासाठी तान्हा पोळाच्या सणाला सुरूवात झाली. इतिहास अभ्यासक चंद्रशेखर गुप्ता याननी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात महाल परिसरात पूर्वी मोठा पोळा भरायचा. त्यानंतर जूनी शुक्रवारी व नंतर वाढलेल्या वसाहतीमधील नवी शुक्रवारीमध्ये पोळ्याचा उत्सव पार पाडला जायचा. यात सर्व समाजातील आणि धर्मातील माणसे सहभागी व्हायची तीच परंपरा आजही कायम आहे.
तान्हा पोळा इव्हेंट ठरतोय
लहान मुलांमध्ये बैल आणि शेतीबद्दल प्रेम निर्माण व्हावे, त्यांच्या मनात बैलांबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी तान्सा पोळा या सणाची निर्मिती झाली. लहान मुले लाकडाचे नंदीबैल तयार करून मोठ्यांचे अनुकरण करीत त्यांना सजवित असत. दिवसभर त्यांना परिचयाच्या घरी फिरवून पूजा करीत असत. त्यांना खाऊ मिळत असे. मात्र ही परंपरा आता बाजुला पडून लाकडी नंदीबैलांचा पोळा इव्हेंटसारखा होत आहे. बैल सजावट, वेशभूषा, स्पर्धा, बक्षिस वितरण यामुळे या सणाचे खरे रूप बाजुला पडले आहे.
लाकडी बैल ५०० रुपयांपासून एक लाखांपर्यंत
लहान मुलांच्या तान्हा पोळ्याची तयारी सुरू झाली आहे. ३१ ऑगस्टला हा सण होत आहे. त्यासाठी बाजारात लाकडी बैल विक्रीला आले आहेत. लकडगंज रोड, बुधवारी, कॉटन मार्केट, सीए रोडवर लाकडी बैलांची दुकाने लागली आहेत. मुलांची आणि पालकांची या बाजारातील दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. रंगीत बैल मुलांचे आकर्षण आहेत.बाजारात ५०० रुपयांपासून तर एक लाख रुपयांपर्यंत सागवान आणि साध्या लाकडांचे नंदीबैल उपलब्ध आहेत. या शिवाय फायबर बैलही बाजारात आले असून त्यांचीही मागणी बरीच आहे. त्यांची किंमत दोन हजारांपासून आहे.
अनेक घरात जुन्या पिढीतील लाकडी बैल
अनेक घरांमध्ये जुन्या पिठढीतील लाकडी नंदीबैल आहे. पोळा झाल्यावर ते जपून ठेवले जातात. मुले मोठी होऊन संसारला लागल्यावर त्यांच्या मुलांकडे अर्थात पुढच्या पिढीकडे हे लाकडी बैल सोपविले जातात. अनेक कुटुंबात असे जुने बैल आजही आहेत. यातून संस्कृतीचे हस्तांरतण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत आहे.