कुंभार समाजबांधवांचा पारंपरिक व्यवसाय माेडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:52+5:302021-09-08T04:12:52+5:30
सुदाम राखडे लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वारेगाव (ता. कामठी) येथे कुंभार समाजबांधवांची १५ कुटुंबे वास्तव्याला आहेत. शेती अथवा ...
सुदाम राखडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : वारेगाव (ता. कामठी) येथे कुंभार समाजबांधवांची १५ कुटुंबे वास्तव्याला आहेत. शेती अथवा अन्य व्यवसाय नसल्याने हे समाजबांधव पिढ्यानपिढ्या त्यांच्या पारंपरिक व्यवसायावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. विशिष्ट प्रकारची माती ही कुंभार व्यवसायाचे अभिन्न अंग आहे. काही वर्षापासून वारेगाव येथील कुंभार समाजबांधवांना मातीच्या टंचाईला सामाेरे जावे लागत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. शासनही आपल्याला आर्थिक मदत करीत नसल्याने या समाजबांधवांनी सांगितले.
मातीची विविध भांडी, मूर्ती, कलाकुसरीच्या वस्तू तयार करून त्यांची बाजारात विक्री करणे आणि त्यातून मिळणाऱ्या मिळकतीवर प्रपंच चालविणे याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे वारेगाव येथील ज्येष्ठ कुंभार व्यावसायिक चंद्रभान जंगलु बुरबाधे (७०) यांनी सांगितले. आपण दरवर्षी गणपती, श्रीकृष्णासह अन्य देवी-देवतांच्या मूर्ती, माठ, रांजण, कुंड्या, मातीची विविध भांडी व खेळणी तयार करणे तसेच ती नागपूर, कामठी, खापरखेडा, मौदा, कोराडी, तारसा, कन्हान, रामटेक यासह अन्य बाजारपेठेत विकण्याचे काम करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कन्हान नदीकाठावरील मातीचा वापर मूर्ती तयार करण्यासाठी करण्यात आला. या मातीला व्यवस्थित व सुबक आकार देणे शक्य होत नसल्याचे चंद्रभान बुरबाधे यांनी सांगितले. यावर पर्याय म्हणून सावरगाव (ता. नरखेड) येथील माती विकत घेण्याचा प्रयत्न केला. ती माती प्रति ट्रक १० हजार रुपयांप्रमाणे खरेदी करावी लागत असून, वाहतुकीचा खर्च वेगळा करावा लागताे. बाजारात मातीच्या भांड्यांसारख्या हुबेहुब प्लास्टिकची भांडी व इतर वस्तू उपलब्ध आहेत. या स्पर्धेत टिकून राहणे शक्य हाेत नसल्याचेही शेषराव बुरबाधे यांनी सांगितले.
काेराेना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे विविध सण सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्यावर बंदी घालण्यात आल्यानेही कुंभार व्यवसायावर विपरित परिणाम झाला. मात्र, शासनाने काेणतीही आर्थिक मदत केली नाही. परिणामी, या व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने ठाेस उपाययाेजना कराव्या, अशी मागणी चंद्रभान बुरबांधे, गोविंदा बुरबांदे, नत्थू बोरसरे, शेषराव बुरबांदे, चुडामण वरखडे, सुशीला बोरसरे, शंकर बोरसरे, शालू बोरसरे, रामू बोरसरे, अजाबराव उईके, सरपंच कमलाकर बांगरे, उपसरपंच राजेश मेश्राम, रत्ना उईके यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.
...
मालगुजारी तलावात फ्लाय ॲश
मूर्ती, भांडी, खेळणी तयार करण्यासाठी कुंभार समाजबांधव वारेगाव शिवारात असलेल्या मालगुजारी तलाव व परिसरातील मातीचा कित्येक वर्षापासून वापर करायचे. या तलावासह परिसरात १९८५ पासून काेराडी वीज केंद्रातील फ्लाय ॲश (राख) साठवायला सुरुवात झाली. त्यामुळे मूर्ती व भांडी तयार करण्यासाठी माती मिळेनाशी झाली. माती बाहेरून १० हजार रुपये प्रति ट्रकप्रमाणे खरेदी करून आणावी लागत असल्याने वाहतूक खर्च करावा लागताे. त्यामुळे मूर्ती व भांड्यांचा उत्पादनखर्च वाढत असून, ग्राहक महागात हे साहित्य खरेदी करीत नसल्याचेही कुंभार समाजबांधवांनी सांगितले.
...
प्लास्टिक वस्तूंशी स्पर्धा
आपल्याकडे शेती अथवा राेजगाराची दुसरी काेणतीही साधने नाहीत. आपल्या व्यवसायाला शासन आर्थिक मदतही करीत नाही. या व्यवसायासाठी बॅंका कर्ज देत नाही. कर्ज दिल्यास या मातीच्या वस्तूंची चढ्या दराने नियमित विक्री हाेत नाही. ग्राहक मातीऐवजी प्लास्टिकच्या वस्तूंना पसंती दर्शवितात. कारण प्लास्टिकच्या वस्तूंची किंमत तुलनेत कमी व टिकावू असतात. त्यामुळे माठ, मडकी, घागरी, रांजन, सुरई यालाच केवळ उन्हाळ्यात मागणी असते, असेही गोविंदा बुरबांदे यांच्यासह इतरांनी सांगितले.