पुढच्या महिन्यात सुरू होणार वाडीच्या उड्डाणपुलावरून वाहतूक; पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर
By नरेश डोंगरे | Published: June 10, 2024 11:43 PM2024-06-10T23:43:27+5:302024-06-10T23:43:53+5:30
या पुलाच्या दोन्ही बाजूला लँडिंग काँक्रीट टाकले जात आहे. वर्षभरापूर्वी १३२ च्या हाय टेंशन लाईनची उंची वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने हे काम प्रभावित झाले.
नागपूर : अमरावती मार्गावरच्या वाडी पोलिस ठाण्यापासून नाका नंबर १० पर्यंत तयार होत असलेल्या उड्डाणपुलावर वाडी टी पॉइंट निश्चित करण्यात आला आहे. हायटेंशन लाईनची उंची कमी असल्यामुळे हे काम रेंगाळले होते. मात्र, हे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढच्या महिन्यात या पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.
या पुलाच्या दोन्ही बाजूला लँडिंग काँक्रीट टाकले जात आहे. वर्षभरापूर्वी १३२ च्या हाय टेंशन लाईनची उंची वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने हे काम प्रभावित झाले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि बरीच गैरसोय झाल्यानंतर आता नागरिकांना अमरावती मार्गावरच्या दोन उड्डाणपुलांपैकी २.५ किलोमीटर लांब वाडी पोलिस स्टेशन ते गुरुद्वारापर्यंतचा पूल लवकरच सुरू होणार आहे. हा पूल झाल्यानंतर वाडी टी- पॉइंटवर वाहनांच्या गर्दीपासून दिलासा मिळू शकतो. मात्र, पुलावरचे आणि खालच्या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण पावसाळा सुरू होत आहे. येथे कामात विलंब झाल्यास पावसामुळे पुन्हा व्यत्यय येईल. सूत्रांच्या माहितीनुसार अचानक वाडी उड्डाणपुलाच्या कामाच्या पूर्णत्वाची अचानक डेटलाईन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत मंत्रिमहोदयांच्या हस्ते या पुलावरच्या वाहतुकीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला जाऊ शकतो.
एक वर्षाची मुदतवाढ
वाडी उड्डाणपुलासोबतच अमरावती मार्गावर आरटीओ कार्यालयापासून युनिव्हर्सिटी कॅम्पसपर्यंत २.९ किलोमीटरचा दुसरा पूलसुद्धा तयार केला जात आहे. मात्र, त्याच्या कामाची गती फारच मंद आहे. आरटीओ कार्यालयाकडे लँडिंगसाठी अजून भूमी अधिग्रहण व्हायचे आहे. महापालिकेकडे वृक्ष कटाईची परवानगी मिळायची आहे. त्यामुळे या पुलाच्या कामासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ मागण्यात आली आहे.
- अमरावती मार्गावरील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२२ ला सुरू झाले.
- प्रकल्प मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची होती अपेक्षा
- आता मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार दुसरा उड्डाणपुल
- पीडब्ल्यूडी एनएच डिव्हीजन करीत आहे पुलाचे बांधकाम