अंबाझरीतील वाहतूक कोंडी सुटणार, नागपुरात चार तासांसाठी VNITतून ट्रॅफिक वळवणार!
By योगेश पांडे | Published: July 13, 2024 12:40 AM2024-07-13T00:40:53+5:302024-07-13T00:42:21+5:30
दुचाकी, रुग्णवाहिकांना परवानगी; सोमवारपासून अंमलबजावणी; न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर प्रशासनाला जाग
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अंबाझरी येथे पुलाचे काम सुरू असल्यामुळे संपूर्ण परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतुकीच्या दुरावस्थेवरून न्यायालयाने वाहतूक पोलीस उपायुक्तांची कानउघाडणी केल्यानंतर प्रशासनाला आता जाग आली आहे. व्हीएनआयटीच्या अंतर्गत मार्गातून दिवसातून चार तास वाहतूकीच्या आवागमनासाठी परवानगी देण्यात आली आहे. सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळांच्या दरम्यान दोन-दोन तास ही परवानगी असेल.
वाहतूक पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी यासंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी रात्री जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ११ जुलै रोजी वाहतूक कोंडीसंदर्भात निर्देश दिले होते. जोपर्यंत सांडव्याच्या पुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत व्हीएनआयटीच्या आतील मार्गातून वाहतूक जाऊ द्यावी असे त्यात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार हिंगण्याकडून येणारी व गजानन टी पॉईंटकडून सिताबर्डीकडे जाणारी वाहने इंडियन ऑईलच्या पेट्रोलपंपासमोरून व्हीएनआयटीने तयार केलेल्या तात्पुरत्या मार्गाने जातील व व्हीएनआयटीच्या प्रवेशद्वार क्रमांक तीन यशवंत नगर चौकात निघतील. या मार्गाने केवळ दुचाकी व रुग्णवाहिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत ही परवानगी असेल असे सातव यांनी या अधिसूचनेतून स्पष्ट केले आहे. ही परवानगी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या महिन्याभरासाठी देण्यात आली आहे. कामाचे स्वरूप पाहता पुढे त्यात वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.