नागपुरात दमदार पावसाने केली वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:28 AM2018-06-11T10:28:26+5:302018-06-11T10:28:33+5:30

उन्हाची काहिली सोसणाऱ्या नागपूकरांना पहिल्या पावसाने दिलासा दिला आहे. मात्र रस्त्यावर करण्यात आलेले खोदकाम, सिमेंटरोडच्या कामामुळे बुजलेल्या ड्रेनेज लाईन्स यातच मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या रस्त्यांमुळे पावसात उपराजधानीच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.

Traffic jam by strong rains in Nagpur | नागपुरात दमदार पावसाने केली वाहतूक कोंडी

नागपुरात दमदार पावसाने केली वाहतूक कोंडी

Next
ठळक मुद्देवर्धा रोेडवर ट्रॅफिक जाम अनेकांचे रेल्वे आणि विमान चुकले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उन्हाची काहिली सोसणाऱ्या नागपूकरांना पहिल्या पावसाने दिलासा दिला आहे. मात्र रस्त्यावर करण्यात आलेले खोदकाम, सिमेंटरोडच्या कामामुळे बुजलेल्या ड्रेनेज लाईन्स यातच मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या रस्त्यांमुळे पावसात उपराजधानीच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने महापालिका प्रशासनाची नेहमीप्रमाणे पोलखोल झाली आहे. वर्धा रोडवर रस्ता खचल्याने तब्बल तीन तास ट्रॅफिक जाम झाला होता.
सिमेंट रोडच्या कामामुळे शहरात पावसाचे पाणी तुंबण्याची भीती वर्तवली जात होती. ही भीती खरी ठरली. सलग दुसºया दिवशी याचा प्रत्यय आला. रविवारी सायंकाळच्या सुमारास जोराचा पाऊ स झाल्याने सिमेंट रोडलगतच्या भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तास दीड तासात शहरात ठिकठिकाणी चौकात व रस्त्यांवर पाणी तुंबले, उड्डाण पुलावर, रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी तुबंले. सखल भागातील वस्त्यात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मान्सूनपूर्व तयारी करताना पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा न काढल्याने ही परिस्थिती उद्भवली.
रामनगर मद्रासी टेंपल येथे पावसामुळे रस्त्यावर झाड पडले. तसेच गिरीपेठ येथील एमआयजी कॉलनी येथे झाड पडण्याची घटना घडली. सुदैवाने यामुळे दुर्घटना घडली नाही. सीताबर्डी उड्डापुलावर शनिवारी पाणी तुंबले होते. पाणी वाहून जाण्यासाठी कर्मचारी लावण्यात आले होते. त्यानंतरही रविवारी पुन्हा पाणी तुंबले होते. गणेश टेकडी मंदिर उड्डाणपुलावरही पाणी साचले. रेल्वे स्टेशन समोरील भागात गुडघाभर पाणी साचले होते. श्रीमोहिनी कॉम्पलेक्सचा समोरील भाग, रिझर्व बँक चौकाच्या बाजूला खोलगट भागात पाणी साचले होते. बजाजनगर भागातील कृषिकुं ज समोरील मार्गावर पाणी साचल्याने दुचाकी वाहने यात बुडाली होती. पाणी ओसरल्यानंतर वाहने काढता आली.

चौकांना, पुलांना आले तलावाचे स्वरूप
शहरातील अनेक चौक व पुलाच्या मार्गावर दरवर्षी पावसाचे पाणी साचून रहदारीची कोंडी होते, परंतु मनपा प्रशासनाचे अद्यापही याकडे लक्ष गेल्याचे दिसून येत नाही. बैद्यनाथ चौक, पंचशील टॉकीज चौक, प्रतापनगर चौक, खामला बाजार चौक, धंतोली पोलीस ठाण्याचा मार्ग, लोखंडी पूल, विजय टॉकिजचा पूल, मेडिकल चौक व नरेंद्रनगर पुलाच्या मार्गावर पाणी साचून होते.

कस्तूरचंद पार्क बनला तलाव
पाणी तुंबल्याने कस्तूरचंद पार्कला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. मैदानातील पाणी संरक्षण भिंतीच्या कठड्यातून बाहेर पडत होते. मैदानातील पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था केली नसल्याने मैदानात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते.

अग्निशमन विभागाची मदत
रामनगर एमआयजी कॉलनी, गिरीपीठ, देवनगर,लक्ष्मीनगर, सोमलवाडा व त्रिमूर्तीनगर आदी भागात पाणी तुंबल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तुंबलेले पाणी काढले.

वीज केली आणि आल्या तीन हजार तक्रारी
वारा आणि मुसळधार पावसाचा फटका वीज ग्राहकांनाही बसला. शहरातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरु होता. एसएनडीएलच्या विविध कार्यालयांमध्ये तब्बल तीन हजारावर नागरिकांनी तक्रारी केल्या. पारडी, महाल, धंतोली, जाफरनगर, बोरगाव आदी परिसरात वीज येत जात होती. यासोबत नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारीही मोठ्या प्रमाणावर होत्या.
सलग दुसºया दिवशी रविवारी नागपुरात जोराचा पाऊ स झाला. दुपारी ३.१५ ते ४ दरम्यान शहराच्या सर्वच भागात पाऊ स पडल्याने मान्सूनचे आगमन झाल्याची चर्चा होती. परंतु हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपुरात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. यवतमाळ व ब्रह्मपुरीच्या आसपास मान्सून रेंगाळल्याची माहिती दिली. नागपुरात मान्सूनचे आगमन होण्याची १० जून ही तारीख आहे. मात्र हवामान विभागाने याची अजूनही घोषणा केलेली नाही. गेल्या २४ तासात नागपूरसह जिल्ह्यात चांगला पाऊ स झाला. नागपुरात सकाळी ८.३० पर्यंत ६६.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील कुही व रामटेक तालुक्यात ७०, पारशिवनी ५०,भिवापूर, सावनेर, व नरखेड येथे ४० तर मौदा तालुक्यात ३० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भातील वर्धा येथे ५०, यवतमाळ ६०, चंद्रपूर मधील कोरपना येथे ५०, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे ५०, मालेगाव ५० तर लाखनी येथे ४० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

Web Title: Traffic jam by strong rains in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस