नागपुरातील ट्रॅफिक जाम फोडतोय दररोज नागरिकांना घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 10:01 AM2018-01-23T10:01:48+5:302018-01-23T10:04:08+5:30
‘आज दुख, कला का सुख’ अशी सांत्वना देत नागपूर ‘आपली मेट्रो’ जनतेचे धाडस वाढवीत आहे. परंतु सातत्याने होत असलेल्या वाहतुकीच्या जाममुळे लोकांचे धैर्य आता खचायला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आज दुख, कला का सुख’ अशी सांत्वना देत ‘आपली मेट्रो’ जनतेचे धाडस वाढवीत आहे. परंतु सातत्याने होत असलेल्या वाहतुकीच्या जाममुळे लोकांचे धैर्य आता खचायला लागले आहे.
लोकांच्या संतापाचा उद्रेक होत नसला तरी हे संकट लवकरात लवकर संपावे, अशी भावना त्यांची आहे. वर्धा रोडवरील वाहन चालक खरोखरच त्रस्त झाले आहेत. सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ दरम्यान येथून वाहन चालविणे चांगलेच कसरतीचे ठरते आहे. ज्यांना या रस्त्यावरून नियमित आवागमन करावे लागते, त्यांचा वाहतुकीच्या जाममुळे बराच वेळ खर्ची जातो आहे. वर्धा रोडवरील रेडिसन ब्ल्यू चौक ते चिंचभवन हा रस्ता पार करण्यासाठी चालकाला अर्धा ते एक तास वेळ लागतो आहे. वर्धा रोडवर रेडिीसन ब्ल्यू चौक ते चिंचभवन पुलाच्या दरम्यान सोमलवाडा चौक, उज्ज्वलनगर चौक, राजीवनगर चौक, पावनभूमी, सोनेगाव चौक, हॉटेल प्राईड हे चौक येतात. या चौकात वाहनचालकांना थांबावेच लागते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने लोकांना कार्यालयात पोहोचायला उशीर होत आहे. मोठ्या संख्येने वाहन थांबल्याने प्रदूषण वाढले आहे. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे वर्धा रोडवरील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. हा शहरातील सर्वात महत्त्वाचा रस्ता असल्याने याचे काम वेगाने व्हायला पाहीजे. सध्या कामाचा वेग मंदावला असल्याचे लोकांचे मत आहे तसेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, अशी लोकांची मागणी आहे.
पर्यायी मार्ग तयार करावे
जितेंद्र दुपारे म्हणाले की, मेट्रोच्या कामामुळे होत असलेला वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेता, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा. त्यामुळे वर्धा रोडवर वाहतुकीचा भार कमी होईल.
वाहनांचे वर्गीकरण झाले पाहिजे
प्रेमनाथ शेलारे म्हणाले की, रस्त्यावरून धावणाऱ्या लहान-मोठ्या, आवश्यक, अनावश्यक वाहनांचे वर्गीकरण झाले पाहिजे. असे झाल्यास वाहतूक सुरळीत होईल.
मेट्रोचे लक्ष नाही
प्रवाल मुखर्जी म्हणाले की, वर्धा रोडवर मेट्रोचे काम वेगाने होऊ शकले असते; परंतु याकडे अपेक्षित लक्ष दिल्या जात नाही आहे.
मेट्रोच्या गार्डचेही कुणी ऐकत नाही
रेडिसन ब्ल्यू ते चिंचभवन दरम्यान जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होतो. परंतु वाहतूक पोलीस केवळ रेडिसन ब्ल्यू व हॉटेल प्राईड चौकातच तैनात असतात; अन्य ठिकाणी मेट्रोचे गार्ड वाहतूक सांभाळतात. परंतु वाहन चालक त्यांच्या निर्देशाचे पालन करीत नाही. हे गार्ड हात दाखवतच असतात, अन् वाहन चालक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. चालकांच्या मते, गार्ड वाहतूक संचालन करण्यासाठी प्रशिक्षित नसल्यामुळे त्यांचे संकेत लक्षात येत नाही, असे वाहन चालक सांगतात. गार्डचे कुणी ऐकत नसल्याने वाहतूक व्यवस्था अस्ताव्यस्त होऊन जाते.
वर्धा रोडवरील रहिवाशांना जगणे कठीण
आदित्य गभणे म्हणाले की, वर्धा रोडवरील रहिवाशांची या कामामुळे शांती भंग झाली आहे. वाहनांचे प्रदूषण, काम सुरू असल्याने सातत्याने होत असलेला आवाज, वाहनांचे कर्णकर्कश आवाज यामुळे परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. वर्धा रोडला लागून असलेल्या गल्ल्यांमधूनही आता जड वाहनांची वर्दळ वाढली आहे.