नागपुरात वाहतूक शाखेचा लाचखोर पोलीस जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:10 AM2019-10-13T00:10:39+5:302019-10-13T00:12:01+5:30
महिन्याला ५०० रुपये पाहिजे म्हणून एका ऑटोचालकाला वेठीस धरणाऱ्या वाहतूक शाखेच्या लाचखोर पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिन्याला ५०० रुपये पाहिजे म्हणून एका ऑटोचालकाला वेठीस धरणाऱ्या वाहतूक शाखेच्या लाचखोर पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले. राजकुमार उदाराम (वय ४३) असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो एमआयडीसी झोनमध्ये कार्यरत होता.
ऑटोचालक हिंगण्यात राहतो. हिंगणा एमआयडीसी ते सीताबर्डी या मार्गावर तो ऑटो चालवितो. या मार्गावर ऑटो चालवायचा असेल तर दर महिन्याला ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगून राजकुमारने ऑटोचालकाला वेठीस धरले होते. त्याचा त्रास वाढल्याने ऑटोचालकाने एसीबीत तक्रार नोंदवली. तक्रारीची शनिवारी दुपारी शहानिशा झाल्यानंतर एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर तसेच अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, हवालदार प्रवीण पडोळे, लक्ष्मण परतेती, प्रभाकर बेले, मंगेश कळंबे आणि राजेश बनसोड यांनी सापळा रचून आरोपी पोलीस कर्मचारी राजकुमार उदाराम याला अटक केली.