वाहतूक पोलीस झाले ‘कॅशलेस’
By admin | Published: March 28, 2017 01:44 AM2017-03-28T01:44:40+5:302017-03-28T01:44:40+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना सापडल्यास आता वाहन चालकांना टपाल खात्यातच दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.
टपाल खात्यातच भरावी लागणार दंडाची रक्कम : गुढीपाडव्यापासून सुरुवात
नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना सापडल्यास आता वाहन चालकांना टपाल खात्यातच दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. वाहतूक पोलीस गुढीपाडव्यापासून ही दंडाची रक्कम स्वीकारणे बंद करणार आहे. शहर पोलिसांनी ६ आॅक्टोबर २०१६ रोजी ई-चालानची सुरुवात केली होती.
याअंतर्गत हेल्मेट, सीट बेल्ट आदीचे चालान केले जात होते. वाहतूक पोलीस वाहन चालकांचे फोटो काढून त्यांच्या पत्त्यावर चालान पाठवितात. वाहन चालकांना टपाल खात्यात चालान भरावे लागते. चालकांना शिस्त लावणे आणि कॅशलेस व्यवस्था लागू करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ई-चालानमुळे वाहन चालकांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.
तसेच वाहतूक विभागाच्या कामकाजातही पारदर्शकता आली आहे. ई-चालानला मिळणारा प्रतिसाद पाहता पोलीस वाहतूक विभागाने आता वाहन चालकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या दंडाची रक्कम स्वीकार न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलीस केवळ चालानची पावती वाहन चालकाला देईल. चालकाला दंडाची रक्कम टपाल खात्यात जाऊन जमा करावी लागेल. आतापर्यंत वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळावरच दंडाची रक्कम स्वीकार करायचे. अशावेळी त्यांच्यावर वसुली करीत असल्याचा आरोपही लागायचा. जागीच दंड न भरणाऱ्यास वाहतूक विभागाच्या संबंधित शाखेत जाऊन दंड भरावा लागत होता. चालान कारवाई दरम्यान वाहन चालकांकडून जप्त दस्तावेज टपाल खात्यात दंड भरण्याची पावती सादर केल्यावर सोपविले जातील. दस्तावेज नसल्यास वाहनाला डिटेन केले जाईल. पूर्णपणे कॅशलेस झाल्याने वाहतूक विभागाचे काम कमी होईल आणि वाहतूक नियमांबाबत चालकांमध्येही गांभीर्य निर्माण होईल. (प्रतिनिधी)