वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून फरफटत नेले; व्हायरल व्हिडीओने उडविली खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 08:40 PM2021-12-18T20:40:50+5:302021-12-18T20:41:16+5:30
Nagpur News सिग्नल तोडून निघालेल्या कारला थांबवणाऱ्या पोलिसालाच बॉनेटवर बसवून ती कार पुढे निघते.. हे पाहणारे नागरिक पुढे येतात.. दोन तरुण त्या कारसमोर दुचाकी आडव्या लावून पोलिसाची सुटका करतात.. वेगळेच नाट्य..
नागपूर - पंचशील चाैक ते कॅनॉल रोड प्रचंड वर्दळीचा मार्ग. या मार्गावर शनिवारी भरदुपारी एक सिल्व्हर कार धावत असते. चालकाच्या समोर बोनेटवर एक वाहतूक शाखेचा पोलीस जीव मुठीत घेऊन बसलेला दिसतो. पोलीस बोनेटवरून खाली पडला तर त्याचे काय होईल, याची सर्वांनाच कल्पना असते. त्यामुळे दुचाकीवरील दोन तरुण सिनेस्टाईल दुचाकी दामटत कारच्या पुढे लावतात अन् चालकाला कार थांबविणे भाग पडते.
बाचाबाची, शिवीगाळ अन् रोष सोबत घेऊन कारचालक सीताबर्डी ठाण्यात पोहोचतो. काही वेळेतच तो सहीसलामत पोलीस ठाण्यातून कार घेऊन निघून जातो. पोलीस दलात या प्रकरणाची कुजबुज सुरू असतानाच या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो अन् नंतर प्रकरणाची माहिती देता देता पोलिसांची नुसती दमछाक होते.
काय आहे प्रकरण?
एमएच ३१-सीपी ९५९४ क्रमांकाच्या कारचा चालक शनिवारी दुपारी मॉरिस कॉलेजचा सिग्नल तोडून भरधाव वेगाने सीताबर्डीकडे निघतो. तो धोकादायक पद्धतीने कार चालवीत असल्याचे पाहून पोलीस ऑन एअर मेसेज देऊन त्याचा पाठलाग सुरू करतात. पंचशील चाैकातून वळण घेऊन कारचालक कॅनाॅल रोडने निघण्याच्या तयारीत असतानाच, वाहतूक शाखेचा पोलीस सागर हिवराळे कारला आडवा होतो. तो मोबाईलमध्ये फोटो घेत असल्याचे पाहून कारचालक सरळ कार पुढे दामटतो. सागर त्याच्या बोनेटवर उडी घेतो. कार तशीच पुढे धावत असते. मागचे-पुढचे वाहनचालक हा प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये कैद करतात. अंग चोरून बोनेटवर बसलेला पोलीस खाली पडला तर काय होईल, याची सर्वांनाच कल्पना असते. त्यामुळे जीव धोक्यात घालून दोन तरुण कारच्या समोर आपली दुचाकी लावतात अन् चालकाला कार थांबवायला भाग पाडतात. वाहनचालकांची गर्दी कारचालकाला घेरते. पोलिसही पोहचतात. शिव्या अन् रोष व्यक्त होतो. नंतर कारचालकाला सीताबर्डी ठाण्यात नेले जाते.
... अन् रोष निवळतो।
पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर कारचालक हरीश शंकरराव भुजाडे (वय ३५) आपली ओळख सांगतो. तो सराफा व्यावसायिक असून इतवारीत राहत असल्याचे स्पष्ट होते. कारमध्ये दोन महिला असतात. एकीला हेवी शुगर असल्याने डॉक्टरकडे जात होतो. घाईगडबडीत जे नको व्हायला ते झाल्याचे सांगून माफीनामा लिहून देतो. ‘सराफाचा माफीनामा अन् शुगर’ पोलिसांचा रोष निवळण्यासाठी पुरेसे ठरतात.
-----