वाहतूक पोलिसावर गुंडांचा हल्ला
By admin | Published: February 11, 2017 02:18 AM2017-02-11T02:18:44+5:302017-02-11T02:18:44+5:30
सक्करदरा पोलीस ठाण्यासमोरच एका गुंडाने आपल्या साथीदाराच्या मदतीने वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली.
सक्करदरा ठाण्यासमोरची घटना : आरोपींना अटक
नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्यासमोरच एका गुंडाने आपल्या साथीदाराच्या मदतीने वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी गुन्हेगाराला रंगेहात पकडले. सागर ऊर्फ गुलाम नामदेव जाधव, सुशील गुप्ता, गोलू गौर, शुभम यादव आणि राहुल नायडू अशी आरोपीची नावे आहेत. वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी शुक्रवारी रात्री ७.१५ वाजता सक्करदरा पोलीस ठाण्याजवळील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला पीक अप वाहनात ठेवत होते. त्यावेळी आरोपी बारमध्ये दारू पित होते.
पोलीस वाहन उचलत असल्याचे माहीत होताच आरोपी व इतर ग्राहक बाहेर आले. त्यांना वाहन उचलले जात असल्याचे दिसले. आरोपी धावत गेले व वाहनात बसलेले पोलीस कर्मचारी किशोर इटनकर यांच्याशी वाद घालू लागले. इटनकर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी त्यांना धक्काबुक्की करू लागले.
त्यांनी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामुळे पाहणाऱ्यांची गर्दी झाली. पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडत असल्याने ठाणेदार नेर्लेकर लगेच घटनास्थळी आले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. वाहतूक शाखेचे निरीक्षक एस.एस. सोनटक्के सुद्धा घटनास्थळी पोहोचले. गुलाम जाधव हा तडीपार गुन्हेगार आहे.
गुलाम आणि सुशीलच्या विरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांचे साथीदार सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. (प्रतिनिधी)