नागपुरात वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:58 PM2019-02-12T22:58:19+5:302019-02-12T22:59:03+5:30
चालान कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला एका दुचाकीचालकाने मारहाण केली. मोहम्मद मोबीन अन्सारी (वय २९, रा. सैफीनगर, मोमिनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. तो पोलिसाला मारत असल्याचे पाहून बाजूच्या वाहनचालकांनी त्याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. संविधान चौकात मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चालान कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला एका दुचाकीचालकाने मारहाण केली. मोहम्मद मोबीन अन्सारी (वय २९, रा. सैफीनगर, मोमिनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. तो पोलिसाला मारत असल्याचे पाहून बाजूच्या वाहनचालकांनी त्याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. संविधान चौकात मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.
वाहतूक शाखेचे हवलदार नीलेश चौधरी मंगळवारी दुपारी संविधान चौकात आपल्या कर्तव्यावर होते. तेवढ्यात तेथे मोबिन अन्सारी दुचाकीवर आला. त्याने हेल्मेट घातले नसल्याचे पाहून चौधरी यांनी मोबिनला हेल्मेटबद्दल विचारले. त्याने वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चौधरींनी मोबिनला लायसन्स आणि दुचाकीची कागदपत्रे मागितली. मोबिन संतापला आणि त्याने नाही आहे काय करणार, असा प्रश्न केला. त्यावरून बाचाबाची तसेच धक्काबुक्की सरू झाली. यात चौधरीच्या शर्टाची खांद्यावरची पट्टी फाटली. दरम्यान, मोबिनने चौधरीच्या गालावर जोरदार ठोसा लगावला. मोबिनच्या बोटात अंगठी असल्यामुळे चौधरीच्या गालावर जखम झाली. ते पाहून बाजूला असलेला दुसरा पोलीस कर्मचारी आणि नागरिक धावले. मोबिन ऐकत नसल्याचे पाहून संतप्त जमावाने त्याला अक्षरश: बदडून काढले. त्यानंतर त्याला सदर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे चौधरींच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी मोबिनला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटक केली.